फुटबॉल हा एक असा खेळ आहे, ज्यामध्ये जर एखादा खेळाडू संपूर्ण सामना खेळला तर त्याला ९० मिनिटे सतत धावत राहावे लागते. या खेळात आळशीपणाला अजिबात वाव नाही. बिबट्यासारखी चपळता असणारा खेळाडूच यात यशस्वी होऊ शकतो. दरम्यान, या खेळाचे नाव फुटबॉल का पडले आणि हे नाव कोणी आणि कशावरून ठेवले याचा विचार तुम्ही केला आहे का?
तुम्ही याविषयी जितके अधिक वाचाल तितके वेगळे अर्थ तुम्हाला सापडतील. कारण फुटबॉल या शब्दाच्या उत्पत्तीबाबत प्रत्येकाची वेगवेगळी मते आहेत.
हा खेळ पायाने खेळतात म्हणून याचे नाव फुटबॉल, असा साधा आणि सरळ अर्थही काढता येतो. फूट म्हणजे पाय आणि बॉल म्हणजे चेंडू. जर तुम्ही फुटबॉल या शब्दाचा मूळ स्रोत शोधण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कुठेही काहीही सापडणार नाही.
जर आपण वर्ल्ड फेडरेशन ऑफ फुटबॉल अर्थात FIFA (Federation of International Football Association) वर विश्वास ठेवला तर फुटबॉल हे सुजू या चिनी खेळाचे विकसित रूप आहे. हा खेळ चीनमध्ये हान राजवंशाच्या काळात विकसित झाला होता. फुटबॉलसारख्या खेळाच्या विकासाचा प्रवास रॉबर्ट ब्रोझ स्मिथ यांनी त्यांच्या एका पुस्तकात सविस्तरपणे लिहिला आहे. हे पुस्तक १८७८ मध्ये लिहिले गेले.
जपानमधील असुका राजघराण्याच्या काळात फुटबॉल खेळला जात असे. तेव्हा हा खेळ केमरी म्हणून ओळखला जाऊ लागला. १५८६ मध्ये ग्रीन लँडमध्येदेखील फुटबॉल खेळला गेला. त्यावेळी हा खेळ जॉन डेव्हिस नावाच्या समुद्री जहाजाच्या कप्तानने त्याच्या साथीदारांसह खेळल्याचे सांगितले जाते.
१४०९ पर्यंत हा खेळ ब्रिटनमध्ये पोहोचला होता. ब्रिटीश प्रिन्स हेन्री चौथा याने पहिल्यांदा इंग्रजीत 'फुटबॉल' हा शब्द वापरला. कालांतराने इथल्या लोकांना हा खेळ आवडू लागला आणि याच कारणामुळे १५२६ मध्ये ब्रिटनचा राजा हेन्री आठवा याने फुटबॉल सहजतेने खेळण्यासाठी शूजची जोडी बनवण्याचा आदेश दिला. १५ व्या शतकात स्कॉटलंडमध्येही फुटबॉल खेळला जात होता.
१६व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि १७व्या शतकाच्या सुरुवातीला फुटबॉल स्पर्धा सुरू झाल्या. त्यावेळी प्रथमच दोन संघांमध्ये फुटबॉल सामना खेळवण्यात आला. तेव्हा प्रथमच या गेममध्ये 'गोल' करण्याचा नियम करण्यात आला. त्यावेळी गोल करण्यासाठी खेळाडूंनी दोन्ही बाजूला झाडं लावून गोल गोल पोस्ट तयार केला होते. त्या काळात ८ किंवा १२ गोलांचा सामना खेळला जायचा.
२०व्या शतकात फुटबॉलमध्ये आंतरराष्ट्रीय संघटना निर्माण करण्याची गरज भासू लागली. मग हा खेळ टिकवण्यासाठी इंग्लिश फुटबॉल असोसिएशनने युरोपातील फ्रान्स, स्पेन, नेदरलँड्स, डेन्मार्क, बेल्जियम, स्वीडन आणि स्वित्झर्लंड या ७ मोठ्या देशांसोबत काही बैठका घेतल्या.
त्यानंतर २१ मे १९०४ रोजी फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशनची स्थापना झाली. त्याला फिफा म्हणतात. फिफाचे पहिले अध्यक्ष रॉबर्ट ग्वेरिन होते. फिफाचे मुख्यालय स्वित्झर्लंड येथील झुरिच येथे आहे.
संबंधित बातम्या