जगप्रसिद्ध जिम्नॅस्ट खेळाडु सिमोन बायल्स (Simone Biles) हिने पॅरिस ऑलिम्पिक-२०२४ स्पर्धेत तब्बल दोन सुवर्णपदके जिंकून इतिहास रचला आहे. झेकोस्लोव्हाकियाची वेरा कास्लाव्स्का या महिला जिम्नॅस्ट खेळाडुनंतर अशी कामगिरी करणारी सिमोन बायल्स ही दुसरी महिला जिम्नॅस्ट खेळाडु ठरली आहे. या स्पर्धेतलं दुसरे सुवर्णपदक जिंकण्यापूर्वी बायल्सने ऑलिम्पिकदरम्यान तिला भेडसावणाऱ्या चिंतातुरता (anxiety) हा विकार आणि त्याच्याशी करावा लागलेला संघर्ष याबद्दल एक व्हिडिओ शेअर केला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत विजय मिळवण्यापूर्वी २७ वर्षीय सिमोन बायल्सने हा व्हिडिओ टिकटॉकवर शेअर केला आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी येण्यापूर्वी तिने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपचार घेतले होते, असं सिमोन बायल्सने या व्हिडिओ म्हटलं आहे. ती सांगते, ‘स्पर्धेत येण्यापूर्वी मी खरोखरच नर्व्हस होते. आणि ते अपेक्षितही होतं. नुकतीच आज सकाळीच मी यासाठीचे उपचार घेतले आहे. त्यामुळे मला थोडे बरे वाटत आहे. या क्षणापर्यंत पोहोचण्यासाठी मी मानसिकदृष्ट्या खंबीर राहण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आज रात्री माझा खेळ होणार आहे. याच प्रसंगासाठी मी सर्वात नर्व्हस आहे.'
सिमोन बायल्स पुढे म्हणाली, ‘पॅरिसमध्ये आल्यापासून मी माझ्यासोबत सेल्फी घेऊ इच्छिणाऱ्या चाहत्यांपासून लांबच आहे. पॅरिसमधल्या ऑलिम्पिक व्हिलेज येथे माझ्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली होती. बरेच लोक मला न विचारता माझ्यासोबत फोटो घेत होते. जेव्हा मी जेवायला बसले तेव्हा माझ्यातली चिंतातुरता ((anxiety) इतकी वाढली की मी अक्षरशः थरथरत होते. माझं थरथरणं थांबू शकत नव्हतं. मी पाच दिवसांपासून कॅफेटेरियालासुद्धा जाणं बंद केलं होतं.' असं सिमोन बायल्स म्हणाली. या घटनेनंतर तिने आपल्या खोलीतच राहण्याचा निर्णय घेतला होता. खाद्यपदार्थ ती खोलीतच मागवत होती.
आपल्या मानसिक आरोग्याच्या समस्येबद्दल मोकळेपणाने व्यक्त होणाऱ्या सिमोनने आरोग्याच्या याच कारणामुळं २०२१ च्या टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेतली होती. आपल्याला ‘ट्विस्टीज’ या मानसिक अवस्थेचा सामना करावा लागला होता, असा खुलासा तिने नंतर केला होता. या अवस्थेमध्ये जिम्नॅस्टचे मन आणि शरीर विभक्त होत असल्याचे त्याला जाणवतं.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिसऱ्या सुवर्णपदकासाठी सिमोन बायल्स शनिवारी पुन्हा मैदानात उतरणार आहे.