मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Video : सामना सुरू असतानाच विराटला भिडला मार्कस स्टॉयनिस, काय घडलं नेमकं?

Video : सामना सुरू असतानाच विराटला भिडला मार्कस स्टॉयनिस, काय घडलं नेमकं?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 23, 2023 09:42 AM IST

Virat Kohli Vs Mark Stoinis in India-Australia Match : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात मैदानावर विराट कोहली आणि मार्कस स्टॉयनीसमध्ये झालेल्या ‘ठस्सन’ची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

Marcus Stoinis - Virat Kohli
Marcus Stoinis - Virat Kohli

India Vs Australia 3rd ODI : चेन्नई इथं बुधवारी झालेला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा व शेवटचा सामना पाहुण्या संघानं २१ धावांनी जिंकून मालिका २-१ अशी खिशात घातली. दोन्ही बाजूंच्या खेळाडूंनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यामुळं सामना अतिशय चुरशीचा झाला. या चुरशीची चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये असतानाच सामन्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टॉयनीस यांच्यात झालेल्या वादाचा हा व्हिडिओ आहे. हा खराखुरा वाद होता की थट्टा-मस्करी होती हे कळू शकलेलं नाही. मात्र, या वादाची दोन्ही बाजूकडच्या क्रिकेटप्रेमींमध्ये जोरदार चर्चा आहे.

भारताची फलंदाजी सुरू असताना व २१ वं षटक सुरू असताना हा प्रसंग घडला. षटकातील तिसरा चेंडू टाकल्यानंतर मार्कस स्टॉइनिस रनअपसाठी परतत होता. त्यावेळी केएल राहुलशी बोलण्यासाठी समोरून येणाऱ्या विराटशी स्टॉयनीसची जोरदार टक्कर झाली. या धडकेनंतर विराटनं रागानं त्याच्याकडं कटाक्ष टाकला. मात्र, विराटच्या प्रतिक्रियेवर स्टॉयनिस स्मित करताना दिसला. त्यावरून स्टॉयनिसनं हेतूपरस्पर विराटला धक्का दिल्याचं बोललं जात आहे. ऑस्ट्रेलियाचे चाहते मात्र विराटवर आरोप करताना दिसत आहेत. अर्थात, नेमकं काय झालं हे समोर येऊ शकलेलं नाही.

असा झाला सामना

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियनं भारतासमोर विजयासाठी २७० धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाकडून एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आलं नाही, भारताच्या वतीनं हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल फलंदाजी करणाऱ्या भारताचा डाव २४८ धावांवर आटोपला. विराट कोहली वगळता कोणत्याही फलंदाजाला ४० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. विराटनं या सामन्यात २ चौकार व एका षटकाराच्या मदतीनं ५४ धावा केल्या. मात्र, तो भारताचा पराभव टाळू शकला नाही. अॅडम झम्पा हा ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हिरो ठरला. त्यानं एकूण ४ बळी घेतले. त्याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

WhatsApp channel