मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli: नंबर सगळ्यांकडे होता, पण एकट्या धोनीने मेसेज केला : विराट कोहली

Virat Kohli: नंबर सगळ्यांकडे होता, पण एकट्या धोनीने मेसेज केला : विराट कोहली

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 05, 2022 08:06 AM IST

मला बरेच लोक टीव्हीवरून सल्ला देत असतात की काय करायचं आहे. त्यांच्याकडे बोलायला भरपूर असतं पण नंबर असूनही त्यांचा एकही मेसेज आला नाही असं म्हणत विराट कोहलीने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

विराट कोहली
विराट कोहली (फोटो - रॉयटर्स)

Virat Kohli: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आता पुन्हा एकदा त्याच्या फॉर्ममध्ये आला आहे. विराट कोहलीने आशिया कप २०२२ मध्ये दोन अर्धशतकांसह १५० धावा केल्या आहेत. आशिया कपमध्ये त्याच्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्यामध्ये सध्या फक्त पाकिस्तानचा मोहम्मद रिजवान आहे. सुपर ४ मध्ये भारताला पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर बोलताना विराट कोहलीने मनमोकळा संवाद साधला. विराट कोहली म्हणाला की, "सगळ्यांकडे माझा नंबर होता, पण जेव्हा मी कसोटीचं कर्णधारपद सोडलं तेव्हा धोनीशिवाय कुणाचाही मला मेसेजसुद्धा आला नाही."

विराट कोहलीने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना धोनीसोबत कसे संबंध होते याबाबत म्हटलं की, "मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू शकतो की जेव्हा कसोटीचं कर्णधारपद सोडलं तेव्हा माझ्याकडे फक्त एकाच व्यक्तीचा मेसेज आला ज्यांच्यासोबत मी खेळलो आणि तो म्हणजे एमएस धोनी. अनेक लोकांकडे माझा नंबर आहे. मला बरेच लोक टीव्हीवरून सल्ला देत असतात की काय करायचं आहे. त्यांच्याकडे बोलायला भरपूर असतं पण नंबर असूनही त्यांचा एकही मेसेज आला नाही."

एक आदर, एक कनेक्शन असतं कोणासोबत तरी, जेव्हा हे संबंध खरे असतात तेव्हा ते असे दिसतात. कारण दोन्ही बाजुला सुरक्षेची भावना असते. ना माझ्याकडून त्यांना काही हवंय, ना त्यांच्याकडून मला काही हवं. मी किंवा ते कधी एकमेकांमुळे असुरक्षित असल्याची भावना नव्हती असंही विराटने धोनीबद्दल बोलताना सांगितलं. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने ४४ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६० धावांची खेळी केली.

विराट कोहलीने टी २० वर्ल्ड कप २०२१ च्या आधी नेतृत्व सोडणार असल्याची घोषणा केली होती. वर्ल्ड कप नंतर आपण टी २० चे कर्णधारपद सोडणार असून कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटच्या कर्णधारपदी असेन असं सांगितलं होतं. मात्र बीसीसीआयने पुढच्याच मालिकेनंतर त्याचं एकदिवसीय संघाचं नेतृत्व काढून घेतलं. त्यानंतर डिसेंबर-जानेवारीत दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटीत १-२ ने पराभव पत्करावा लागला. त्यानंतर विराटने कसोटी संघाचे नेतृत्वही सोडले.

WhatsApp channel

संबंधित बातम्या