team india flop against left arm fast bowlers : विशाखापट्टणम वनडेत टीम इंडिया ऑस्ट्रेलियन संघासमोर पूर्णपणे नतमस्तक झालेली दिसली. प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव केवळ ११७ धावांत गारद झाला. यानंतर ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य एकही विकेट न गमावता अवघ्या ११ षटकांत पूर्ण केले.
या सामन्यात मिचेल स्टार्कने ८ षटकात ५३ धावा देत ५ बळी घेतले. स्टार्कने रोहित शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि मोहम्मद सिराज यांची विकेट घेतली. स्टार्कच्या धारदार गोलंदाजीसमोर भारतीय शेर फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले.
स्टार्क टॉप ४ फलंदाज टार्गेटवर ठेवतो
मिचेल स्टार्कने टीम इंडियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये केवळ १५ सामन्यांमध्ये २५ विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने दोन वेळा एका डावात ५ विकेट्स घेतल्या आहेत. २०१५ मध्ये मेलबर्न येथे झालेल्या सामन्यात मिचेल स्टार्कने भारताविरुद्ध १० षटकात ४३ धावा देऊन ६ विकेट घेतल्या होत्या. आता विशाखापट्टणममध्येही त्याने ५ बळी घेतले आहेत.
मिचेल स्टार्क नेहमीच टीम इंडियाच्या सलामीवीर आणि स्टार फलंदाजांना आपला बळी बनवतो. यामुळेच स्टार्कच्या आक्रमणानंतर टीम इंडिया बॅकफूटवर जाते. भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये मिचेल स्टार्कने रोहित शर्मा आणि शिखर धवन यांना प्रत्येकी ३-३ वेळा बाद केले आहे. त्यानंतर त्याने शुबमन गिल, सूर्यकुमार यादव यांना २-२ वेळा बाद केले आहे आणि विराट कोहलीलाही त्याने एकदा बाद केले आहे. म्हणजेच टॉप-४ फलंदाज नेहमीच स्टार्कच्या टार्गेटवर असतात.
स्टार्क, बोल्ट आणि शाहीन...
टीम इंडिया केवळ मिचेल स्टार्कविरुद्धच नाही तर वेगवान डाव्या हाताच्या गोलंदाजाविरुद्ध संघर्ष करताना दिसली आहे. मिचेल स्टार्क व्यतिरिक्त, पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी आणि न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट यांनी अलीकडच्या काळात टीम इंडियाला खूप त्रास दिला आहे.
ट्रेंट बोल्ट (trent boult)
जर आपण न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टकडे बघितले तर त्याने भारताविरुद्ध १३ एकदिवसीय सामन्यांमध्ये २४ विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने भारताविरुद्ध एकदा एका डावात ५, तर एकदा एका डावात ४ विकेट्स घेतल्या आहेत. ट्रेंट बोल्टने भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरला अनेकदा आपली शिकार बनवले आहे. त्याने वनडेत शिखर धवनला ५ वेळा, रोहित शर्माला ४ वेळा, विराट कोहलीला ३ वेळा बाद केले आहे.
शाहीन आफ्रिदी (shaheen afridi)
पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने भारताविरुद्ध फक्त एकच वनडे सामना खेळला आहे. परंतु टी-20 मध्ये त्याने भारताविरुद्धच्या ३ सामन्यांमध्ये ३ विकेट्स घेतल्या आहेत. या तिन्ही विकेट २०२१ च्या T20 विश्वचषक सामन्यात मिळाल्या, जेव्हा पाकिस्तानने भारताचा १० विकेट्सने पराभव केला होता. या सामन्यात शाहीन आफ्रिदीने केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहलीची विकेट घेत टीम इंडियाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले होते.