मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli Fan: ७१वे शतक होईपर्यंत लग्न... शपथ घेतलेला फॅन चढला बोहल्यावर, विराटनं दिलं खास गिफ्ट

Virat Kohli Fan: ७१वे शतक होईपर्यंत लग्न... शपथ घेतलेला फॅन चढला बोहल्यावर, विराटनं दिलं खास गिफ्ट

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 17, 2023 02:37 PM IST

virat kohli fan wedding : विराट कोहलीच्या ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकाची प्रत्येक क्रिकेट चाहत्याला प्रतीक्षा होती. ते पूर्ण करण्यासाठी १०२० दिवस लागले. यादरम्यान एका चाहत्याने कोहलीचे ७१वे शतक पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही, अशी शपथ घेतली होती. ही प्रतीक्षा विराटने गेल्या वर्षी आशिया कपमध्ये संपवली. त्या चाहत्याचे आता लग्न झाले आहे. सोबत विराटने चाहत्याला लग्नाची खास भेट देखील दिली आहे.

Virat Kohli
Virat Kohli

विराट कोहलीने २०२३ ची सुरुवात धमाकेदार केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत त्याने दोन शतके झळकावली. तिरुवनंतपुरम वनडेमध्ये कोहलीने १६६ धावांची खेळी केली. हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७४ वे शतक ठरले.

दरम्यान, विराट कोहलीचे ७१ वं शतक हे सर्वात खास आहे. कारण कोहली ३ वर्षांहून अधिक काळ वाईट फॉर्मात होता. त्याच्या बॅटमधून शतक निघत नव्हते. मात्र, २०२२ च्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया चषक टी -२० मध्ये त्याने अफगाणिस्ताविरुद्ध शतकी खेळी केली. तब्बल ३ वर्षांनंतर त्याने शतक झळकावले होते. चाहते त्याच्या शतकाची आतुरतेने वाट पाहत होते.

अशातच, एक चाहता असाही होता. ज्याने जोपर्यंत विराटचे ७१वे शतक होत नाही तो पर्यंत आपण लग्न करणार नाही! अशी शपथ घेतली होती. मात्र, कोहलीने आशिया चषकात शतक ठोकून चाहत्याच्या लग्नाचा मार्ग मोकळा केला होता.

अमनला लग्नाच्या दिवशी मिळालं स्पेशल गिफ्ट

आता, विराटच्या त्याच जबरा फॅनचे लग्न झाले आहे. विराटच्या त्या जबरा फॅनचे नाव अमन अग्रवाल असे आहे. १५ जानेवारी रोजी त्याचे लग्न झाले. त्याच दिवशी विराटने श्रीलंकेविरुद्ध १६६ धावांची खेळी खेळली.

यासंबंधीची एक पोस्ट अमन अग्रवालने ट्विटरवर शेअर केली आहे. अमनने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, मी ७१ वे शतक मागितले होते. पण, माझ्या लग्नाच्या दिवशी विराटने ७४ वे शतक ठोकून हा दिवस आणखी खास बनवला आहे.

सोबतच अमनने एक कोलाज शेअर केला आहे, ज्यामध्ये एका बाजूला लिहिले आहे की, 'विराट कोहली त्याचे ७१ वे शतक जो पर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही'. तर दुसरीकडे, हाच चाहता शेरवानी घालून उभा आहे आणि विराट टीव्हीवर शतकानंतर बॅट दाखवताना दिसत आहे. कोहलीच्या या जबरा फॅनच्या पोस्टला लाखो लोकांनी लाईक केले आहे.

WhatsApp channel