Asia Cup 2023: भारत आणि श्रीलंका यांच्यात मंगळवारी आशिया चषकातील सुपर-४ सामना खेळला गेला. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळण्यात आलेल्या या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने आशिया चषकातील फायनलमध्ये धडक दिली. या सामन्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे, ज्यात श्रीलंकेची जर्सी घातलेला व्यक्ती दुसऱ्या चाहत्यांच्या अंगावर धावून जातो. हा व्हिडिओ भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यानंतरचा असल्याचे अनेक सोशल मीडिया युजर्सचे म्हणणे आहे. मात्र, याबद्दल अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
व्हिडिओच्या सुरुवातीला पोलिसांचा गणवेश परिधान केलेली एक महिला काही लोकांशी बोलत आहे. मात्र, काही वेळानंतर श्रीलंकेच्या जर्सीतील एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या अंगावर धावून जातो. यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेले लोक यांच्यातील वाद मिटवतात.
श्रीलंकाविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघ २१३ धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघाला १७२ धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा (५३ धावा) आणि विकेटकिपर केएल राहुलने (३९ धावा) केल्या. या दोघांव्यतिरिक्त भारताच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. श्रीलंकेकडून चरिथा असलंका (४ विकेट्स) आणि दुनिथ वेल्लालगे (५ विकेट्स) यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली.
या विजयासह भारताने फायनलमध्ये धडक दिली आहे. भारतीय संघ त्यांच्या पुढील सामना बांगलादेशसोबत खेळणार आहे. तर, श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात १४ सप्टेंबरला काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ फायनलमध्ये भारताशी भिडेल.