भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिने इतिहास रचला आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये विनेशने एकाच दिवशी जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या ३ कुस्तीपटूंना धुळ चारली आणि सुवर्ण पदकाच्या सामन्यात प्रवेश केला. विनेशने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपले रौप्यपदक निश्चित केले आहे.
विनेश फोगटने आज ५० किलो वजनी गटाची अंतिम फेरी जिंकली तर तिला सुवर्णपदक मिळेल आणि ती हरली तर तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागेल.
पण या दरम्यान, विनेशचा एक सहकारी कुस्तीपटू बजरंग पुनिया याचे एक वक्तव्य प्रचंड चर्चेत आले आहे. विनेशच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर बजरंगने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोमणा लगावत खोचक सवाल केला आहे.
एका मीडिया चॅनलशी बोलताना बजरंग पुनिया याने देशाच्या सरकारवर आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली आहे. तो म्हणाला, की “अभिनंदन करण्यासाठी किती वाजता फोन येईल याची मी वाट पाहतोय… ती पुन्हा देश की बेटी बनली आहे. जंतर मंतरवर आंदोलन करताना या देशाच्या लेकीसाठी एकही शब्द निघाला नाही, आता तेच कोणत्या तोंडाने अभिनंदन करतील?"
विशेष म्हणजे, ऑलिम्पिकमध्ये किंवा कोणत्याही मोठ्या स्पर्धेत खेळाडूने अथवा संघाने पदक, ट्रॉफी जिंकले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी फोन करून त्या संघाचे किंवा खेळाडूचे अभिनंदन करतात.
हाच धागा पकडत बजरंग पुनियाने सरकार आणि पंतप्रधान मोदी यांचा खरपूस समाचार घेतला आहे, कारण काही दिवसांपूर्वीच भारतीय कुस्तीपटू दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करत होते. त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे शोषण केल्याचा आरोप केला होता. या चळवळीत अनेक कुस्तीपटू सहभागी झाले होते, ज्यांनी मोठ्या स्पर्धांमध्ये देशासाठी सुवर्ण, रौप्य किंवा कांस्य पदके जिंकली आहेत.
पण त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या प्रकरणी कोणतेही वक्तव्य समोर आले नव्हते.
तसेच, बजरंग पुनियाने एक ट्वीट करत विनेशचे तिच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.
"विनेशने इतिहास रचला आहे. विनेश महिला कुस्तीमध्ये ऑलिम्पिक अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. आज सर्व भारतीयांच्या डोळ्यात अश्रू आहेत.
या देशाच्या कन्या आहेत, ज्यांनी नेहमीच देशाची शान वाढवली आहे. ज्या लोकांनी या मुलींच्या मार्गात नेहमीच काटे आणले, त्यांनी निदान या मुलींकडून तरी धडा घ्यावा आणि भविष्यात या मुलींच्या मार्गात काटे पेरणे बंद करावे".