पॅरिस ऑलिम्पिक २०२४ हे भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटसाठी दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हते. आता विनेश पॅरिसहून घरी परतली आहे. भारतात आल्यावर विनेशचे भव्य स्वागत करण्यात आले. दिल्ली विमानतळापासून ते गावी पोहोचेपर्यंत चाहत्यांनी विनेशला भरभरून प्रेम दिले.
गावात पोहोचल्यानंतरही विनेशचा मोठा सन्मान राखला गेला आणि याच दरम्यान तिची प्रकृती खालावली आणि ती बेशुद्ध झाली.
विनेश बेशुद्ध पडल्याचा व्हिडिओही समोर आला होता, विनेशला तिच्या हरियाणातील बलाली गावात सन्मानित करण्यात आले. विनेशला तिचे समर्थक आणि गावातील खाप पंचायत सदस्यांनी सुवर्णपदक देऊन गौरविले. या सोहळ्यादरम्यान विनेश बेशुद्ध पडली.
व्हिडिओमध्ये असे दिसून येते की सत्कार समारंभात विनेश बेहोश झाली आणि तिच्याभोवती बरेच लोक बसलेले दिसत आहेत, ज्यात कुस्तीपटू बजरंग पुनिया देखील आहे. विनेशला बेशुद्धावस्थेत पाहून तेथे उपस्थित लोक चिंतेत पडले. विनेशचा हा व्हिडिओ nnis Sports ने X च्या माध्यमातून शेअर केला आहे.
पॅरिसहून भारतात आल्यावर, विनेशने प्रेम आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि तिच्या बलाली गावातील महिला कुस्तीपटूंना प्रशिक्षण देऊ शकले तर ती तिच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट असेल, असे विनेशने म्हटले.
विनेश म्हणाली, "या गावातून एकही कुस्तीगीर उदयास आला नाही तर निराशा होईल. आम्ही आमच्या यशाने मार्ग मोकळा केला आहे आणि आशाही दिली आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करते की या गावातील महिलांना पाठिंबा द्या. भविष्यात त्यांना यश मिळवायचे असेल तर, त्यांना आमची जागा घ्यायची असेल तर त्यांना तुमचा पाठिंबा, आशा आणि विश्वास हवा आहे.”
विशेष म्हणजे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये विनेशने ५० किलो कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता. तिने स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, परंतु अंतिम फेरीच्या दिवशी १०० ग्रॅम वजन जास्त झाल्यामुळे ती अपात्र ठरली. यानंतर भारतीय कुस्तीपटूने रौप्य पदकाची मागणी केली, पण ती फेटाळण्यात आली.