भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगट नुकतीच पॅरिस ऑलिम्पिकमधून परतली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिच्यासोबत जे घडलं ते एखाद्या दुखद स्वप्नापेक्षा कमी नाही. पण सोमवारी (१९ ऑगस्ट) रक्षाबंधनाच्या निमित्ताने विनेश फोगट खूप आनंदी होती.
तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती तिच्या भावासोबत दिसत आहे. विनेश तिच्या भावाच्या घरी हरियाणातील चरखी दादरी या गावी राखी बांधण्यासाठी आली होती.
तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या विनेशने राखी बांधल्यानंतर भावासोबत मजा मस्तीही केली. यावेळी तिचा भाऊ हरविंदर याने आयुष्यभराची कमाई विनेशला भेट म्हणून दिली, गेल्या वर्षी फक्त ५०० रुपये दिले होते.
राखीच्या सणाच्या दिवशी विनेश फोगटने आपल्या भावाला ऑलिम्पिक जर्सी घालून राखी बांधली. विनेशने या व्हिडिओमध्ये म्हटले की, 'मी आता जवळपास ३० वर्षांची आहे. पूर्वी तो मला १० रुपये द्यायचा, गेल्या वर्षी त्याने मला ५०० रुपये दिले. आता त्याने आयुष्यभराची कमाई देऊन टाकली आहे. हा व्हिडिओ त्याच्या भावाने शेअर केला आहे.
विनेश फोगट शनिवारी (१७ ऑगस्ट) दिल्लीत पोहोचली. भारतात आल्यावर विनेशचे भव्य स्वागत करण्यात आले. दिल्ली विमानतळापासून ते गावी पोहोचेपर्यंत चाहत्यांनी विनेशला भरभरून प्रेम दिले.
विमानतळावरील लोकांचे प्रेम पाहून विनेशला रडू कोसळले. दिल्लीपासून तिच्या गावापर्यंत सुमारे १३५ किलोमीटरचे अंतर होते, हा संपूर्ण प्रवास तिने लोकांमध्ये घालवला. दिल्ली ते बलाली हा १३५ किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी त्यांना सुमारे १२ तास लागले.
वाटेत अनेक गावातील लोकांनी विनेशचे स्वागत केले. धनकट बदली जहाजगड, लोहारवाडा घासौला, मांडौला अशा अनेक ठिकाणी थांबून तिने लोकांची भेट घेतली.
या ऐतिहासिक स्वागतानंतर विनेश म्हणाली होती, "सुवर्णपदक नाही मिळालं तर काय, पण इथल्या लोकांनी मला सुवर्णपदकापेक्षा जास्त प्रेम दिलं आहे.' त्यांच्या गावात ७५० किलो देशी तुपाचे लाडू बनवण्यात आले. शनिवारी गावात पोहोचताच तिचे हिरोसारखे स्वागत करण्यात आले. ऑलिम्पिकमध्ये पराभूत होऊनही मिळालेल्या प्रेमाचा विनेशवर खूप प्रभाव पडला.
ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी विनेश ही पहिली भारतीय महिला कुस्तीपटू होती. पण फायनलच्या दिवशी वजन वाढल्यामुळे ती अपात्र ठरली. विनेशने क्रीडा लवाद न्यायालयात अपील करून तिला रौप्यपदक मिळावे, अशी मागणी केली. विनेशने पहिल्या दिवशी तीन सामने जिंकले असल्याने तिला रौप्यपदक मिळाले पाहिजे, असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांच्यासह तिच्या वकिलांनी केला. मात्र त्यांचे अपील फेटाळण्यात आले.