vinesh phogat announced her retirement : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचं मैदान गाजवणाऱ्या भारताला बुधवारी मोठा धक्का बसला. फायनलपर्यंत धडक मारलेली व सुवर्ण पदकाची आशा जागवणारी कुस्तीपटू विनेश फोगाट हीच वजन १०० ग्रॅमने वाढल्याने तिला ऑलिम्पिक मधून बाद करण्यात आलं आहे. दरम्यान, सर्व देश तिच्या कामगिरीचे कौतुक करत असतांना आज सकाळी विनेशने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर भावुक पोस्ट लिहीत कुस्तीला कायमचा अलविदा करत निवृत्तीची घोषणा केली आहे.
इंडियन ऑलिम्पिक असोसिएशननं (IOA) बुधवारी एक निवेदन जारी करत महिला कुस्तीच्या ५० किलो वजनी गटातून विनेश फोगाटला अपात्र ठरविले होते. तिचे वजन ५० किलोपेक्षा काही ग्रॅम जास्त भरल्याने तिला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिला धीर देत सर्व भारतीयांना तिच्यावर गौरव असल्याचं म्हणत तिचं सांत्वन केलं होतं. तसेच भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला या प्रकरणी योग्य कारवाई करण्याचे सांगितलं होतं. दरम्यान, तिच्या विरुद्ध कट रचण्यात आल्याचा आरोप देखील तिच्या घरच्यांनी केला होता. मात्र, आज सकाळी विनेशने एक्सवर पोस्ट लिहीत कुस्तीला कायमचा अलविदा केला आहे.
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिने आज गुरुवारी ८ ऑगस्ट रोजी पहाटे कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर तिने या बाबत माहिती दिली. एक्सवर पोस्ट करताना विनेश फोगाटने भाऊक होऊन तिच्या आईचा उल्लेख करत लिहिले की, 'आई, माझ्याकडून कुस्ती जिंकली, मी हरले, माफ करा, तुझे स्वप्न, माझे धैर्य सर्व संपल आहे, आता माझ्याकडे यापेक्षा जास्त ताकद नाही. अलविदा कुस्ती २००१-२०२४. मी तुम्हा सर्वांची सदैव ऋणी राहीन, क्षमस्व.
पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलपूर्वी १०० ग्रॅम वजनामुळे विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आले होते, त्यानंतर विनेशने हा निर्णय घेतला. यासह तिचे ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्नही अधुरे राहिले. तिने २०१६, २०२० आणि २०२४ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे, परंतु तिला एकदाही पदक जिंकता आले नाही. पॅरिसमध्ये अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर तिचे रौप्य पदक निश्चित झाले होते, परंतु वजन जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले.
विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजनी गटात लढत होती. ६ ऑगस्ट रोजी, तिने जागतिक क्रमवारीत-१ आणि गेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील चॅम्पियन युई सासाकीसह तीन कुस्तीपटूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी १०० ग्रॅम जास्त वजनामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले.
सध्या विनेश फोगाटने ऑलिम्पिकच्या निर्णयाविरोधात कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (CAS) मध्ये तक्रार केली आहे. विनेश फोगाटला पदक मिळणार की नाही याबाबत सीएएस आज निर्णय देणार आहे. वजन कमी करण्यासाठी विनेशने रात्रभर मेहनत केली, त्यामुळे तिच्या शरीरात पाणी कमी झाल्याने ती आजारी पडली आणि तिला रुग्णालयात दाखल करावे लागले.