WPL Cricket Score, MUM vs UP Women’s Premier League 2023 : महिला प्रीमियर लीगमध्ये आज (१८ मार्च) मुंबई इंडियन्सचा सामना यूपी वॉरियर्सशी (MI VS UPW) झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकात १२७ धावा केल्या. प्रत्युत्तरात यूपीने १९.३ षटकांत लक्ष्य गाठले.
MI vs UP wpl 2023 Live Score updates
MI vs UP Live Score : मुंबईचा पराभव
महिला प्रीमियर लीगच्या १५व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पहिला पराभव पत्करावा लागला. रोमहर्षक लढतीत यूपी वॉरियर्सने मुंबईचा पाच गडी राखून पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत १२७ धावा केल्या. प्रत्युत्तरात यूपीने १९.३ षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. मुंबईने या लीगमध्ये आतापर्यंत सहा सामने खेळले असून पाच जिंकले आहेत. हा त्याचा पहिला पराभव आहे. मुंबई इंडियन्स आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरली आहे.
यूपीला विजयासाठी शेवटच्या १२ चेंडूत १३ धावा करायच्या होत्या. त्यावेळी सोफी एक्लेस्टोन आणि दीप्ती शर्मा क्रीजवर होत्या. हेली मॅथ्यूजने १९व्या षटकात ८ धावा दिल्या. यानंतर यूपीला विजयासाठी शेवटच्या षटकात ५ धावांची गरज होती. इस्सी वाँगने पहिल्या दोन चेंडूंवर एकही धाव दिली नाही. सोफी एक्लेस्टोनने तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकत यूपी संघाला विजय मिळवून दिला.
त्याचबरोबर यूपीचा ६ सामन्यांमधला हा तिसरा विजय आहे. संघ सहा गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. प्लेऑफच्या शर्यतीत यूपीचा संघ अजूनही अबाधित आहे. मुंबई १० गुणांसह अव्वल तर दिल्ली कॅपिटल्स ८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
यूपी आणि मुंबई या दोन्ही संघांना आता प्रत्येकी दोन सामने खेळायचे आहेत. यूपी संघाचा सामना २० मार्च रोजी गुजरात जायंट्स आणि २१ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सशी होईल. त्याचवेळी मुंबई संघाला २० मार्चला दिल्ली आणि २१ मार्चला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी सामना करायचा आहे.
MI vs UP Live Score : यूपीला तिसरा धक्का
१२८ धावांचा पाठलाग करताना यूपीची सुरुवात खराब झाली. संघाने सात षटकांत तीन विकेट गमावल्या आहेत. देविका वैद्य, अॅलिसा हिली यांच्यापाठोपाठ किरण नवगिरेही बाद झाली. यास्तिकने तिचा एका हातात शानदार झेल घेतला. सात षटकांनंतर यूपीची धावसंख्या तीन बाद ३५ आहे. सध्या ताहिला मॅकग्रा आणि ग्रेस हॅरिस क्रीजवर आहेत.
MI vs UP Live Score : मुंबईचा डाव १२७ धावांवर आटोपला
मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्ससमोर १२८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा संघ निर्धारित २० षटकांत १२७ धावांवर सर्वबाद झाला. हेली मॅथ्यूजने सर्वाधिक ३५ धावा केल्या. त्याचवेळी यूपीकडून सोफी एक्लेस्टोनने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.
प्रथम फलंदाजी करताना मुंबईने दमदार सुरुवात केली. हेली मॅथ्यूज आणि यास्तिका भाटिया यांनी पहिल्या विकेटसाठी ३० धावांची भागीदारी केली. मात्र, अंजली सरवणीने यास्तिकला क्लीन बोल्ड केले. यास्तिकाला सात धावा करता आल्या. यानंतर फॉर्मात असलेली फलंदाज नॅट सीव्हर ब्रंट काही विशेष करू शकली नाही. ती ५ धावा करून एक्लेस्टोनच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू आऊट झाली. हेली मॅथ्यूजनेही धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात तिची विकेट गमावली. तिला ३० चेंडूत एक चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३५ धावा करता आल्या.
कर्णधार हरमनप्रीत कौर २२ चेंडूत २५ धावा करून बाद झाली. अमेलिया केर काही विशेष करू शकली नाही आणि ३ धावा करून बाद झाली. अमनजोत कौर (५), हुमैरा काझी (४), धारा गुर्जर (३) आणि सायका इशाक (००) हेही झटपट बाद झाले. मुंबईच्या ८ फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही.
यानंतर शेवटी इस्सी वाँगने १९ चेंडूंत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३२ धावांची तुफानी खेळी केली. २०व्या षटकात मुंबईच्या २ विकेट पडल्या. या षटकात इस्सी वाँग आणि सायका धावबाद झाली. उत्तर प्रदेशकडून सोफी एक्लेस्टोनशिवाय राजेश्वरी गायकवाड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याचवेळी अंजली सरवणीला एक विकेट मिळाली.
MI vs UP Live Score : मुंबईला सहावा धक्का
९८ धावांवर मुंबईला सहावा धक्का बसला. सोफी एक्लेस्टोनच्या गोलंदाजीवर अमनजोत कौर यष्टिचित झाली. अमनजोत कौरला सात चेंडूंत पाच धावा करता आल्या. सध्या इस्सी वाँग आणि हुमैरा काझी क्रीजवर आहेत.
MI vs UP Live Score : मुंबईला तिसरा धक्का
मुंबई इंडियन्सला ११व्या षटकात ५७ धावांवर तिसरा धक्का बसला. सोफी एक्लेस्टोनने हेली मॅथ्यूजला अॅलिसा हिलीने झेलबाद केले. हीली ३० चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ३५ धावा करू शकली. मुंबईची धावसंख्या ११ षटकांत ३ बाद ५९ अशी आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अमेलिया केर सध्या क्रीजवर आहेत.
MI vs UP Live Score : मुंबईला दुसरा धक्का
मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का ३९ च्या स्कोअरवर बसला. सोफी एक्लेस्टोनने नॅट सीव्हर-ब्रंट एलबीडब्ल्यू बाद केले. नॅट सीव्हरला आठ चेंडूंत पाच धावा करता आल्या. सध्या हेली मॅथ्यूज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर क्रीजवर आहेत. आठ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात ४० धावा आहे.
MI vs UP Live Score : मुंबई इंडियन्सला पहिला धक्का
मुंबई इंडियन्सला पहिला धक्का पाचव्या षटकात ३० धावांवर बसला. यास्तिका भाटियाला अंजली सरवणीने क्लीन बोल्ड केले. यास्तिकाला १५ चेंडूत सात धावा करता आल्या. सध्या नेट-सिवर ब्रंट आणि हेली मॅथ्यूज क्रीजवर आहेत.
MI vs UP Live Score : दोन्ही प्लेइंग इलेव्हन
यूपी वॉरियर्स : अॅलिसा हिली (कर्णधार), देविका वैद्य, किरण नवगिरे, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, सिमरन शेख, दीप्ती शर्मा, पार्श्वी चोप्रा, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड.
मुंबई इंडियन्स : यास्तिका भाटिया, हीली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, इस्सी वोंग, हुमैरा काझी, धारा गुर्जर, अमनजोत कौर, जिंतीमणी कलिता.
MI vs UP Live Score : यूपीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली
यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यूपीची कर्णधार अॅलिसा हिलीने प्लेइंग-११ मध्ये फक्त एक बदल केला आहे. पार्श्वी चोप्राला संधी देण्यात आली आहे.