Khashaba Jadhav Untold Story: देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे, ऑलिम्पिक मैदानावर, सातासमुद्रापार भारताचा तिरंगा डौलानं फडकावणारे मराठमोळे पैलवान स्वर्गीय खाशाबा जाधव यांची आज ९९ वी जयंती आहे. खाशाबा जाधव यांनी जिंकलेले ऑलिम्पिक पदक आजही देशातील खेळाडू व क्रीडाक्षेत्रासाठी मुख्य प्रेरणास्त्रोत आहे. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले, घडलेले आलिंपिकवीर पैलवान स्वर्गीय खाशाबा जाधव आणि हेलसिंकी ऑलिम्पिक मैदानावरची त्यांनी केलेली ऐतिहासिक कामगिरी भावी पिढीला कायम प्रेरणा देत राहील.
भारतासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा पराक्रम कराडच्या मराठमोळ्या खाशाबा जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी स्पर्धेत घडविला. फिनलॅण्ड देशाच्या राजधानीतील १५व्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत फ्री स्टाइल बँटमवेट कुस्ती गटात खाशाबांनी कॅनडा, मेक्सिको, जर्मनीच्या कुस्तीपटूंना चीतपट करून कांस्यपदक मिळवले. खाशाबांनंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदकासाठी तब्बल ४४ वर्षे वाट पाहावी लागली.
महान कुस्तीपटू खाशाबा जाधव (१५ जानेवारी १९२६ - १४ ऑगस्ट १९८४) यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील गोळेश्वर या छोट्याशा गावात झाला होता. खाशाबा जाधव यांना महाराष्ट्र सरकारचा मरणोत्तर छत्रपती पुरस्कार (१९९२-९३) आणि केंद्र सरकारचा अर्जुन पुरस्कार (२०००) मिळाला आहे. याशिवाय, २०१० मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्सच्या कुस्ती मार्गाला त्यांचे नाव देण्यात आले होते. इतिहासात ते स्वतंत्र भारतातील पहिले क्रीडापटू म्हणून ओळखले जातात.
खशाबा जाधव यांनी १९४८ मध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. तेव्हा कोल्हापुरच्या महाराजांनी त्यांच्या लंडन दौऱ्याचा खर्च केला होता. मात्र, त्यावेळी त्यांना एकही सामना जिंकता आला नव्हता. परंतु, १९५२ मध्ये हेलंसकी येथे झालेल्या ऑलिम्पिकसाठी क्वालीफाय केले.मात्र, तिथे जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांनी लोकांकडून पैसे गोळा केले. त्यावेळी वारंवार मदत मागितल्यानंतर सरकारने त्यांना चार हजाराची मदत केली. मात्र, तरीही पैसे कमी पडत होते. काहीच पर्याय शिल्लक न राहिल्याने त्यांनी कॉलेजच्या प्राचार्याकडे आपले घर गहाण ठेवले.
संबंधित बातम्या