U19 Asia Cup 2023: सेमीफायनलमध्ये भारताचा दारुण पराभव; ४ विकेट्सनं सामना जिंकत बांगलादेश फायनलमध्ये!
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  U19 Asia Cup 2023: सेमीफायनलमध्ये भारताचा दारुण पराभव; ४ विकेट्सनं सामना जिंकत बांगलादेश फायनलमध्ये!

U19 Asia Cup 2023: सेमीफायनलमध्ये भारताचा दारुण पराभव; ४ विकेट्सनं सामना जिंकत बांगलादेश फायनलमध्ये!

Dec 15, 2023 10:00 PM IST

Bangladesh Beats India: अंडर-१९ आशिया चषकातील अंतिम फेरीत पोहोचलेल्या दोन्ही संघाची नावे स्पष्ट झाली आहेत.

U19 Asia Cup २०२३
U19 Asia Cup २०२३

Under 19 Asia Cup 2023: दुबईत खेळल्या जाणाऱ्या अंडर- १९ आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या भारतीयांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. आशिया चषकातील सेमीफायनल सामन्यात भारताला बांगलादेशकडून लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. बांगलादेशने ४३ चेंडू शिल्लक ठेवून भारतावर ४ विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह बांगलादेशने अंडर-१९ आशिया चषकातील अंतिम सामन्यात धडक दिली, जिथे त्यांचा सामना यूएईशी होणार आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेला भारतीय संघ संघर्ष करताना दिसला. बांगलादेशच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताला २०० धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. भारत १८८ धावांवर ऑलआऊट झाला. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने चांगली फलंदाजी करत हा सामना जिंकला.

बांगलादेशचा कर्णधार माहफुजुर रेहमानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. बांगलादेशच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवला. भारताची सलामी जोडी अवघ्या १० धावांवर माघारी परतली. भारताची धावसंख्या १३ असताना कर्णधार उदय खाते न उघडताच परतला. भारतीय फलंदाजाने ठराविक अंतराने विकेट गमावली. भारताकडून मुशीर खान (५० धावा) आणि मुरुगन अभिषेक (६२ धावा) यांनाच अर्दशतक झळकावता आली. त्याव्यतिरिक्त भारताच्या कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. यातील सहा खेळाडूंना तर दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही. अशाप्रकारे भारतीय संघ ४२.४ षटकात १८८ धावांवर ऑलआऊट झाला.

भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघाची सुरुवात खराब झाली. दरम्यान, ३४ धावांवर बांगलादेशच्या संघाने तीन विकेट्स गमावले. अरिफुल इस्लामने ९० चेंडूत ९४ धावा आणि अहरार अमीनने १०१ चेंडूत ४४ धावा करत बांगलादेशचा विजय निश्चित केला. दोघांमध्ये १३८ धावांची भागीदारी झाली.

Whats_app_banner
विभाग