मराठी बातम्या  /  क्रीडा  /  T20 World Cup 2022: ‘हे’ दोन धुरंधर भारताला वर्ल्डकप जिंकून देणार, २००७ च्या विश्वचषकातही एकत्र होते

T20 World Cup 2022: ‘हे’ दोन धुरंधर भारताला वर्ल्डकप जिंकून देणार, २००७ च्या विश्वचषकातही एकत्र होते

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 13, 2022 10:55 AM IST

२००७ च्या टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला धुळ चारुन जेतेपद पटकावले होते. त्या संघात सध्याचा कर्णधार रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक हे दोघेही होते. आता १५ वर्षांनंतर पुन्हा हे दोन्ही खेळाडू एकत्र टी-२० वर्ल्डकप खेळणार आहेत.

team india t20 world cup 2007
team india t20 world cup 2007

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ही घोषणा सोमवारी (१२ सप्टेबर) करण्यात आली आहे. या संघात दिनेश कार्तिकचीदेखील निवड झाली आहे

विशेष म्हणजे, T20 विश्वचषकासाठी कार्तिकचा टीम इंडियामध्ये समावेश होणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. कारण २०२१ च्या विश्वचषकात दिनेश कार्तिक कॉमेंट्री करत होता. तर यंदा तो भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला जाणार आहे.

आयपीएलच्या माध्यमातून संघात पुनरागमन

३७ वर्षीय कार्तिकने IPL २०२२ मध्ये जबरदस्त कामगिरी केली. या मेहनतीचे फळ त्याला मिळाले आहे. IPL नंतर जेवढ्या संधी त्याला मिळाल्या आहेत, त्यांचा योग्य उपयोग करण्यात तो नियमितपणे यशस्वी झाला आहे. मात्र, कार्तिकला आशिया चषकात फारशा संधी मिळाल्या नाहीत. ज्यावर बरेच प्रश्नही उपस्थित झाले होते. पण आता कदाचित टी-२० विश्वचषकादरम्यान यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिक संघ व्यवस्थापनाची पहिली पसंती असू शकतो.

१५ वर्षांनंतर रोहित आणि कार्तिक एकत्र टी-20 वर्ल्ड कप खेळणार

दिनेश कार्तिक दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा भाग असणार आहे. यापूर्वी, कार्तिक एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ मध्ये पहिला विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. कार्तिक व्यतिरिक्त रोहित शर्मा देखील २००७ च्या T20 विश्वचषकात भारतीय संघात होता. १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक टी-20 वर्ल्ड कपमध्ये एकत्र खेळताना दिसणार आहेत.

२०२१ वर्ल्डकपमध्ये भारताची खराब कामगिरी

गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात 'मेन इन ब्लू'चा पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. त्यामुळे सुपर-१२ स्टेजमधूनच टीम इंडिया बाहेर पडली होती. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर टी-२० विश्वचषक जिंकून हा दुष्काळ संपवेल, अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या