मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Team India Vice Captain : टीम इंडियात उपकर्णधारपदासाठी चुरस, हे ३ खेळाडू सर्वात मोठे दावेदार

Team India Vice Captain : टीम इंडियात उपकर्णधारपदासाठी चुरस, हे ३ खेळाडू सर्वात मोठे दावेदार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 20, 2023 12:37 PM IST

who is team india new vice captain : BCCI च्या निवड समितीने केएल राहुलचे कसोटी उपकर्णधारपद काढून घेतले आहे. निवडकर्त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा केली असून, त्यात केएल राहुलकडून उपकर्णधारपद काढून घेण्यात आले आहे.

Team India Vice Captain
Team India Vice Captain

बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. मात्र, बीसीसीआयने केएल राहुलबाबत मोठा निर्णय घेतला आहे. वास्तविक राहुलला कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे.

केएल राहुलला भारतीय कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून हटवल्यानंतर आता भारताचे नवे कसोटी उपकर्णधार होण्याचे सर्वात मोठे दावेदार असलेले ३ खेळाडू आहेत. चला तर मग त्या ३ खेळाडूंवर एक नजर टाकू जे भारताचे नवे कसोटी उपकर्णधार होऊ शकतात.

शुभमन गिल

टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुबमन गिलला भारताचा पुढील कसोटी उपकर्णधार बनवले जाऊ शकते. २३ वर्षीय शुभमन गिल त्याच्या निडर फलंदाजीसाठी ओळखला जातो. शुभमन गिल उपकर्णधार झाल्यास केएल राहुलला कसोटी संघातून बाहेर पडावे लागेल. केएल राहुलच्या जागी शुभमन गिल रोहित शर्मासोबत कसोटी सलामीवीराची भूमिका निभावू शकतो आणि उपकर्णधारपदही सांभाळू शकतो. अशा स्थितीत गिलकडे सलामीसह भारताच्या कसोटी उपकर्णधारपदाची जबाबदारीही दिली जाऊ शकते.

गिलचे कसोटी क्रिकेटमध्ये खूप उज्ज्वल भविष्य आहे, अशा परिस्थितीत तो टीम इंडियासाठी दीर्घकाळ सलामीवीर बनू शकतो आणि उपकर्णधाराची भूमिकाही बजावू शकतो.

ऋषभ पंत

कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ऋषभ पंतची उत्कृष्ट कामगिरी पाहता त्याला भारताचा पुढील कसोटी उपकर्णधार बनवले जाऊ शकते. पंत हा भारताचा पुढील कसोटी उपकर्णधार होण्याचा प्रबळ दावेदार आहे. २५ वर्षीय ऋषभ पंत तरुण आहे आणि तो दीर्घकाळ भारताचा कसोटी उपकर्णधार राहू शकतो. ऋषभ पंत जरी T20 आणि ODI क्रिकेटमध्ये फ्लॉप फलंदाज ठरला असला तरी तो कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात मोठा मॅचविनर आहे. पण तो सध्या अपघातामुळे क्रिकेटपासून दूर आहे.

श्रेयस अय्यर

श्रेयस अय्यरने भारतासाठी आतापर्यंत ८ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ४९.२३ च्या उत्कृष्ट सरासरीने ६४० धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यरने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये १ शतक आणि ५ अर्धशतके झळकावली आहेत. श्रेयस अय्यर हा भारताचा पुढील कसोटी उपकर्णधार होण्याचा दावेदार आहे. २८ वर्षीय अय्यरने आता भारताच्या कसोटी संघात आपले स्थान निश्चित केले आहे.

सोबतच, श्रेयस अय्यर टीम इंडियासाठी कसोटीत सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करतो आणि खेळाच्या या फॉरमॅटमध्ये त्याचा रेकॉर्डही जबरदस्त आहे. श्रेयस अय्यरला भारताचा पुढील कसोटी उपकर्णधार बनवल्यास संघाला त्याचा मोठा फायदा होईल.

WhatsApp channel

संबंधित बातम्या