मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rahul Dravid पुन्हा एकदा इंग्लंडला हरवणार? भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा इतिहास

Rahul Dravid पुन्हा एकदा इंग्लंडला हरवणार? भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा इतिहास

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 24, 2022 05:18 PM IST

भारताने १९३२ साली पहिल्यांदा इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळली होती, पण भारताला पहिली कसोटी मालिका जिंकण्यात १९७१ मध्ये यश मिळाले होते.

rahul dravid
rahul dravid

भारयीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामना हा १ जुलैपासून सुरू होणार आहे. या मालिकेदरम्यान, टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची मोठी संधी आहे. इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून कसोटी मालिका जिंकल्यानंतर द्रविड यांना आता प्रशिक्षक म्हणूनही इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे.

भारताने आतापर्यंत केवळ तीन वेळाच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली आहे. भारताने यापूर्वी २००७ मध्ये हा पराक्रम केला होता. त्यावेळी भारताचा कर्णधार राहुल द्रविड होता. आता तो प्रशिक्षक आहे. त्यामुळे त्याला आता प्रशिक्षक म्हणूनही इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे.

२०२१ मध्ये आयोजित केलेली ही पाच सामन्यांची कसोटी मालिका त्यावेळेस कोरोनामुळे पूर्ण होऊ शकली नाही. त्या मालिकेतील एक सामना शिल्लक राहिला होता. तो यावेळी होणार आहे. या कसोटी मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे. तसेच, मालिकेतील हा पाचवा सामना जिंकला किंवा अनिर्णित राखला तर टीम इंडिया ही मालिका जिंकेल. असे झाल्यास भारताची इंग्लंडमध्ये जाऊन कसोटी मालिका जिंकण्याची ही चौथी वेळ असेल.

भारत- इंग्लंड कसोटी मालिकेचा इतिहास-

भारताने १९३२ साली पहिल्यांदा इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळली होती, पण भारताला पहिली कसोटी मालिका जिंकण्यात १९७१ मध्ये यश मिळाले होते. या मालिकेत भारताने इंग्लंडला त्यांच्याच भूमीवर प्रथमच पराभूत केले होते. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने एक सामना जिंकला तर दोन सामने अनिर्णित राखले होते. इंग्लिश भूमीवर भारताचा हा पहिला विजय ठरला. 

यानंतर भारताने १९८६ मध्ये इंग्लंडमध्ये पुन्हा मालिका जिंकली. यावेळी तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने दोन सामने जिंकले आणि एक सामना अनिर्णित राखला होता. तर २००७ मध्ये भारताला इंग्लंडमध्ये तिसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकण्यात यश आले. यावेळीही कसोटी मालिका ही तीन सामन्यांचीच होती. मालिकेतील दोन सामने अनिर्णित राहिले होते, तर एका सामन्यात भारताने विजय मिळवला होता.

यानंतर २०११ मध्ये भारत पुन्हा इंग्लंड दौऱ्यावर गेला. त्यावेळी भारताने ४ सामन्यांची मालिका खेळली. हे सर्व सामने भारताने गमावले होते. २०१४ मध्ये पाच सामन्यांची मालिका भारताने १-३ ने गमावली. तसेच, २०१८ मध्ये पाच सामन्यांची मालिका भारताला १-४ ने गमवावी लागली होती. 

आता भारत २०२१-२२ ची ही मालिका २-१ किंवा ३-१ अशा फरकाने जिंकण्याची भारताला संधी आहे. मात्र, जर भारताने शेवटचा सामना गमावला तर मालिका २-२ अशी बरोबरीत राहील.

WhatsApp channel