India vs Nepal: आशियाई क्रिडा स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत भारताचा युवा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) नेतृत्वाखाली भारताने नेपाळचा (IND vs NEP) २३ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला. युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या (Yashasvi Jaiswal) वादळी शतकाच्या जोरावर भारताने नेपाळसमोर २० षटकात २०३ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात नेपाळच्या संघाला १७९ धावांपर्यंत मजल मारला आली. आवेश खान (Avesh Khan), रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) आणि अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर नेपाळचे फलंदाज अपयशी ठरले.
नेपाळविरुद्ध नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वालने संघाला चांगली सुरुवात करून दिली. परंतु, भारताच्या डावात दहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर ऋतुराज गायकवाड बाद झाला. यानंतर तिलक वर्मा (२ धावा), जितेश शर्मा (५ धावा) स्वस्तात माघारी परतले. मात्र, यशस्वी जैस्वालने धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. यशस्वी जैस्वालने ४९ चेंडूवर १०० धावा केल्या. दरम्यान, १६व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर दिपेंद्र सिंहने त्याला बाद केले. यानंतर शिवम दुबे (२५ धावा) आणि रिंकू सिंह (३७ धावा) अखेरच्या षटकात फटकेबाजी करत भारताच्या धावसंख्येत आणखी भर घातली. भारताने २० षटकात ४ विकेट गमावून २०२ धावा केल्या. नेपाळकडून दिपेंद्र सिंहने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर,सोमपाल कामी आणि लामिछाने यांनी प्रत्येकी एक-एक विकेट मिळवली.
भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या नेपाळच्या संघ सुरुवातीपासूनच डगमगताना दिसला. नेपाळकडून दिपेंद्र सिंहने सर्वाधिक ३२ धावांची खेळी केली. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला ३० धावांचा आकडा ओलांडता आला नाही. नेपाळने २० षटकात ९ विकेट गमावून १७९ धावा केल्या. भारताकडून आवेश खान आणि रवी बिश्नोईला प्रत्येकी तीन- तीन विकेट मिळाल्या. तर, अर्शदीपच्या खात्यात दोन विकेट जमा झाल्या. याशिवाय, रविश्रीनिवासन साई किशोरने एक विकेट घेतली.
रुतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकिपर), रिंकू सिंह, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रविश्रीनिवासन साई किशोर, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंह.
कुशल भुरटेल, आसिफ शेख (विकेटकीपर), संदीप जोरा, गुलसन झा, रोहित पौडेल (कर्णधार), कुशल मल्ला, दीपेंद्र सिंह आयरी, सोमपाल कामी, करण केसी, अविनाश बोहरा, संदीप लामिछाने.
संबंधित बातम्या