मराठी बातम्या  /  क्रीडा  /  ८ वर्षांनी सीरीज जिंकली, टीम इंडियाची शॅम्पेननं अंघोळ, जंगी सेलिब्रेशनचा Video

८ वर्षांनी सीरीज जिंकली, टीम इंडियाची शॅम्पेननं अंघोळ, जंगी सेलिब्रेशनचा Video

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 18, 2022 01:57 PM IST

टीम इंडियाने मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसर्‍या वनडे सामन्यात इंग्लंडचा ५ गडी राखून पराभव केला. यासह तीन सामन्यांची वनडे मालिका २-१ अशी खिशात घातली.

team india
team india

भारताने एकदिवसीय मालिकेत इंग्लंडला २-१ ने पराभूत करून विजयाने दौऱ्याचा शेवट केला. मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात यजमानांनी प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियासमोर २६० धावांचे लक्ष्य ठेवले होते, हे लक्ष्य भारताने रिषभ पंतच्या शतकाच्या जोरावर ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.

दरम्यान, ८ वर्षांनंतर भारताला इंग्लिश भूमीवर एकदिवसीय मालिकेत इंग्लंडला पराभूत करण्यात यश आले. याआधी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडच्या भूमीवर तिरंगा फडकवला होता.

या धमाकेदार विजयानंतर टीम इंडिया विजयाचा जल्लोष साजरा केला. संपूर्ण टीम इंडिया शॅम्पेनमध्ये नाहून निघाली. भारतीय खेळाडूंच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अर्शदीपला ट्रॉफी उचलण्याचा बहुमान मिळाला-

महेंद्रसिंग धोनीने मालिका जिंकल्यानंतर संघातील सर्वात तरुण खेळाडूला ट्रॉफी उचलण्याचा बहुमान देण्याची प्रथा सुरु केली होता. ही प्रथा आता टीम इंडियाची परंपरा बनली आहे. विराट कोहलीपाठोपाठ रोहित शर्मा आणि इतर कर्णधारांनी देखील ही परंपरा सुरु ठेवली आहे. संघातील सर्वात युवा अर्शदीप सिंगला इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर ट्रॉफी उचलण्याचा बहुमान मिळाला. अर्शदीपची वनडे संघासाठी निवड झाली होती, मात्र दुखापतीमुळे हा खेळाडू अंतिम आकरासाठी उपलब्ध होऊ शकला नाही.

३९ वर्षांनंतर मँचेस्टरमध्ये टीम इंडियाने सामना जिंकला-

इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यापूर्वी भारताने यजमानांविरुद्ध मँचेस्टरमध्ये चार सामने खेळले होते, ज्यात संघाला तीन वेळा पराभवाला सामोरे जावे लागले होते. या मैदानावर टीम इंडियाला एकमेव विजय हा १९८३ विश्वचषकात मिळाला होता. त्यानंतर या मैदानावर भारत विजयी होऊ शकला नाही, मात्र आता रोहित शर्माने ३९ वर्षांनी पराभवाचा दुष्काळ संपवून हा पराक्रम केला आहे.

WhatsApp channel