Ajinkya Rahane India vs South Africa : टीम इंडियाचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणेने आपल्या फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. या यादीत आता भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर यांचाही समावेश झाला आहे. रहाणेने विक्रम राठौर यांना खूपच प्रभावित केले आहे. यामुळेच विक्रम राठौर यांनी अजिंक्य रहाणेला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही संधी देण्याचे संकेत दिले आहेत.
भारत डिसेंबर-जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत पुढील कसोटी मालिका खेळणार आहे.
राठौर यांनी सांगितले की, 'आत्मविश्वासाने खेळणे हा रहाणेच्या पुनरागमनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे आणि या वर्षाच्या उत्तरार्धात दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही तो आपला फॉर्म कायम ठेवेल अशी आशा भारतीय संघाला आहे".
गेल्या महिन्यात भारताने लंडनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (WTC) फायनल खेळली. यामध्ये भारताचा पराभव झाला. पण अजिंक्य रहाणेने WTC फायनलमध्ये ८९ आणि ४६ धावांची खेळी खेळली, त्या सामन्यात हीच एकमेव टीम इंडियासाठी सकारात्मक बाजू होती.
रहाणेच्या पुनरागमनावर राठोड म्हणाले की, 'त्याने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये चांगली कामगिरी केली. तो नेहमीच चांगला खेळाडू राहिला आहे. खराब फॉर्ममुळे त्याला संघातून वगळण्यात आले होते. जेव्हा टेक्निकचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही त्यावर सतत काम करता, पण माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो या सर्व काळात खूप शांत होता".
रहाणेची १८ महिन्यांनंतर WTC फायनल ही पहिलीच कसोटी होती आणि त्यानंतर सध्याच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. भारताने पहिला कसोटी सामना एक डाव आणि १४१ धावांनी जिंकला. आता वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे २० जुलैपासून सुरू होईल.
राठोड पुढे म्हणाला, 'तो लेट आणि शरीराच्या जवळ शॉट्स खेळत आहे. पुनरागमनानंतर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तो अजूनही नेटमध्ये अशीच फलंदाजी करत आहे. आम्हाला आशा आहे की तो चांगले करेल. दक्षिण आफ्रिकेच्या परिस्थितीत चांगली कामगिरी करण्यासाठी तुम्हाला त्याच्यासारख्या व्यक्तीची गरज आहे."
संबंधित बातम्या