मराठी बातम्या  /  क्रीडा  /  T20 World cup 2022 Super 12: टीम इंडिया अगदी सहज सेमीफायनल गाठू शकते, कारण…

T20 World cup 2022 Super 12: टीम इंडिया अगदी सहज सेमीफायनल गाठू शकते, कारण…

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Oct 22, 2022 03:16 PM IST

T20 World cup 2022 Super 12: सुपर १२ फेरी आजपासून सुरु झाली आहे. भारतीय संघ ग्रुप २ मध्ये आहे. हा ग्रुप भारतासाठी सोपा मानला जात आहे. कारण या गटात पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हेच तगडे संघ आहेत. बाकीच्या संघांना भारत सहज पराभूत करु शकतो. त्यामुळे टीम इंडिया अगदी सहजपणाने सेमी फायनल गाठू शकते.

T20 World cup 2022
T20 World cup 2022

T20 World cup 2022 Super 12: टी-२० विश्वचषकातील सुपर १२ फेरी सुरु झाली आहे. तर भारतीय संघाला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. उभय संघांमधील हा सामना २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे.

यंदाच्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठण्यात कोणतीही अडचण नसावी कारण रोहित ब्रिगेडला सोपा गट मिळाला आहे. पाकिस्तानशिवाय भारताला केवळ दक्षिण आफ्रिका संघाकडूनच तगडे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. भारतीय संघाने या दोघांचा पराभव केल्यास प्रवास सुकर होऊ शकतो.

भारतीय संघाच्या गटात नेदरलँड, बांगलादेश आणि झिम्बाब्वे सारखे संघ आहेत. नेदरलँड्स आणि झिम्बाब्वेविरुद्ध भारताला विजय मिळवण्यात कोणतीही अडचण नसेल. मात्र, बांगलादेशविरुद्ध विजय मिळविण्यासाठी भारताला थोडा संघर्ष करावा लागू शकतो.

सुपर १२ मध्ये ५ पैकी ४ सामने जिंकणे गरजेचे

यावेळी उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला ५ पैकी ४ सामने जिंकावे लागतील. तसे, ३ सामने जिंकूनही भारत उपांत्य फेरीचे तिकीट कापू शकतो, पण त्यासाठी भारताला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. गेल्या विश्वचषकात भारताने तीन सामने जिंकले होते मात्र उपांत्य फेरीत स्थान मिळवता आले नव्हते.

गेल्या टी-२० विश्वचषकातही भारतीय संघाला सोपा गट मिळाला होता. त्यावेळी भारताच्या गटात पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबिया हे संघ होते. अशा स्थितीत भारत उपांत्य फेरी गाठण्यात नक्कीच यशस्वी होईल, अशी अपेक्षा होती पण घडले उलटेच. भारताला त्यांच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये अनुक्रमे पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, नंतर भारताने सलग तीन सामने जिंकले. मात्र, तरी भारत सेमी फायनल गाठण्यात अपयशी ठरला.

ग्रुप १ मानला जातोय ग्रुप ऑफ डेथ

सुपर-१२ टप्प्यात दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, आयर्लंड आणि अफगाणिस्तान हे ग्रुप १ मध्ये आहेत. म्हणजेच हा गट-१ हा 'ग्रुप ऑफ डेथ' मानला जात आहे. दुसरीकडे, भारत, पाकिस्तान, झिम्बाब्वे, नेदरलँड, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या संघांचा गट २ मध्ये समावेश आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या