
India vs England T20 World Cup 2nd Semi Final: सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताचा १० विकेट्सने धुव्वा उडवला. इंग्लंडने १६९ धावांचे लक्ष्य एकही विकेट न गमावता पूर्ण केले. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ६ बाद १६८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने १६ षटकात एकही विकेट न गमावता १७० धावा करत सामना जिंकला. इंग्लंडकडून अॅलेक्स हेल्सने ४७ चेंडूत नाबाद ८६ धावा केल्या. तर कर्णधार जोस बटलरने ४९ चेंडूत ८० धावा केल्या. भारताच्या सहापैकी ४ गोलंदाजांनी आज १० पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या.
तत्पूर्वी भारताकडून विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने अर्धशतके झळकावली.या दोघांशिवाय भारताचे सर्व धुरंधर फ्लॉप ठरले. विराट-पांड्याच्या बळावर संघ १६८ धावांपर्यंत पोहोचला. कोहलीने ४० चेंडूत ५० धावा केल्या तर पांड्याने ३३ चेंडूत ६३ धावा केल्या.
भारताच्या पराभवाची ही ५ मोठी कारणे
१) ओपनिंग जोडी फेल
भारताची सलामीची जोडी पुन्हा फ्लॉप ठरली. रोहित शर्मा आणि केएल राहुल टीम इंडियाला चांगली सुरुवात देऊ शकले नाहीत. अवघ्या ९ धावांवर संघाने पहिली विकेट गमावली. राहुलने ५ धावा केल्या. तर रोहित शर्माने २८ चेंडूत २७ धावा केल्या.
२) पॉवर प्लेमध्ये संथ फलंदाजी
टीम इंडियाने पॉवरप्लेमध्ये संथ फलंदाजी केली. महत्वाच्या सामन्यांमध्ये केएल राहुल नेहमीच फ्लॉप ठरत आलेला आहे. रोहितलाही स्पर्धेत विशेष कामगिरी करता आली नाही. त्याच्यावर कर्णधारपदाचा दबावच जास्त दिसत होता. राहुल बाद झाल्यानंतर रोहित आणि विराट दबावात फलंदाजी करताना दिसले. त्यामुळे पॉवरप्लेमध्ये भारताला केवळ ३८ धावाच करता आल्या.
३) इंग्लंडच्या फिरकीपटूंंची कमाल
इंग्लंडच्या फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांना मोकळेपणाने खेळू दिले नाही. लेगस्पिनर आदिल रशीदने ४ षटकात केवळ २० धावा दिल्या आणि सूर्यकुमार यादवची मोठी विकेटही घेतली. त्याचवेळी लियाम लिव्हिंगस्टोननेही ३ षटकात २१ धावा देत भारतीय फलंदाजांना बांधून ठेवले.
४) पॉवरप्लेमध्ये भारतीय गोलंदाजांना विकेट घेता आली नाही
पॉवरप्लेमध्ये भारताचे गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. ६ षटकांतच इंग्लंडने बिनबाद ६३ धावा ठोकल्या होत्या. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी आणि अक्षर पटेल यांना कुणालाच धावा रोखता आल्या नाहीत.
५) बटलर-हेल्सची अप्रतिम फलंदाजी
जॉस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी पहिल्या विकेटसाठी नाबाद १७० धावा जोडल्या आणि संघाचा विजय निश्चित केला. या दोन्ही फलंदाजांचे विश्वचषकातील हे दुसरे अर्धशतक आहे. बटलर ४९ चेंडूत ८० आणि ४७ चेंडूत ८६ धावा करून नाबाद राहिले.
संबंधित बातम्या
