
T20 World Cup 2022: T20 विश्वचषक २०२२ मधील सेमी फायनलचे ४ संघ निश्चित झाले आहेत. पहिल्या गटातून न्यूझीलंड आणि इंग्लंडने उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचबरोबर दुसऱ्या गटातून भारत आणि पाकिस्तानने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता सेमी फायनल १ मध्ये पाकिस्तानचा सामना न्युझीलंडशी होणार आहे. हा सामना ९ नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. तर सेमी फायनल २ मध्ये भारताचा सामना १० नोव्हेंबर रोजी इंग्लंडशी होणार आहे. हा सामना अॅडलेड ओव्हल क्रिकेट मैदानावर होईल.
उपांत्य फेरीचे सामने सुरू होण्यापूर्वी आपण सेमी फायनल २ मधील दोन्ही संघांच्या कमकुवत आणि भक्कम बाजू पाहणार आहोत.
टीम इंडिया-
मजबूत बाजू:
भारतीय संघ या वर्ल्डकपमध्ये संतुलित दिसत आहे. लोकेश राहुलपासून विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव हे धावा करत आहेत. त्याचबरोबर भुवनेश्वर, अर्शदीप, मोहम्मद शमी हे तिघेही गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी करत आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीला फिरकी गोलंदाज फार काही करू शकले नव्हते, पण झिम्बाब्वेविरुद्ध अश्विन आणि अक्षर यांनी मिळून ४ बळी घेतले. भारतीय संघाचे हे प्रमुख खेळाडू लयीत आहेत.
कमकुवत बाजू :
कर्णधार रोहित शर्मा बऱ्याच दिवसांपासून लयीत नाही. त्याने नेदरलँड्सविरुद्ध अर्धशतक झळकावले, पण या सामन्यात त्याला बरेच जीवनदान मिळाले होते. त्या सामन्यानंतर त्याची बॅट पुन्हा शांत झाली. हार्दिक पंड्याचीही अवस्था हीच आहे. तो पूर्वीप्रमाणे शेवटच्या षटकांमध्ये स्फोटक फलंदाजी करू शकलेला नाही. पाकिस्तान आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात हार्दिकला शेवटच्या षटकांमध्ये वेगाने धावा करता आल्या नाहीत.
इंग्लंड
मजबूत बाजू :
इंग्लंडचा संघ स्फोटक फलंदाजांनी भरलेला आहे. पहिल्या क्रमांकापासून ते नवव्या क्रमांकापर्यंत या संघात असे खेळाडू आहेत जे मोठे फटके सहज खेळू शकतात आणि वेगाने धावा करण्यात पटाईत आहेत. या कारणामुळेच इंग्लंडचा संघ टी-20 मध्ये २०० च्या जवळपास धावा सहज करु शकतो. गोलंदाजीत सॅम करन डेथ ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी करत आहे. तसेच, मार्क वूड आणि ख्रिस वोक्स हे आपल्या वेगाने फलंदाजांना त्रस्त करत आहेत.
कमकुवत बाजू:
डेथ ओव्हर्समध्ये इंग्लंडची गोलंदाजी उत्कृष्ट आहे, पण पॉवरप्लेमध्ये हा संघ फारसा प्रभाव पाडू शकलेला नाही. पहिल्या सहा षटकांमध्ये इंग्लंडचे गोलंदाज जास्त धावा देत आहेत. याशिवाय कठीण खेळपट्टीवर हा संघ फ्लॉप होतो, कारण डेव्हिड मलानशिवाय संघात असा एकही खेळाडू नाही, जो खेळपट्टीवर अधिक काळ थांबून फलंदाजी करु शकतो.
संबंधित बातम्या
