नेदरलँड्सची जलतरणपटू शेरॉन व्हॅन रूवेन्डाल हिने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. १० किमी मॅरेथॉन पोहण्यात रूवेन्डाल हिने सुवर्णपदक पटकावले. पदक जिंकल्यानंतर रुवेंडलच्या डोळ्यात अश्रू होते.
खरं तर, रूवेन्डालने हे पदक तिच्या कुत्र्याला समर्पित केले, ज्याचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. तिचा कुत्रा रिओ याच्यावर तिचे खूप प्रेम होते आणि तो गेल्यानंतर तिने आत्मविश्वास आणि प्रेरणा गमावली होती.
मात्र, वडिलांच्या एका शब्दाने रूवेन्डालचे मनोबल वाढले आणि तिला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जाण्याची प्रेरणा मिळाली. नेदरलँड्सच्या जलतरणपटूचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. रूवेन्डालच्या हातावर रिओचा टॅटू आहे. सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिने सर्वप्रथम टॅटूचे चुंबन घेतले.
रिओ हा पोमेरानियन जातीचा कुत्रा होता. रिओ ऑलिंपिकमधील शानदार कामगिरीनंतर रुवेंडलने आपल्या कुत्र्याचे नाव रिओ ठेवले. २०१६ मध्ये ब्राझीलच्या रिओ शहरात झालेल्या ऑलिंपिकमध्ये तिने सुवर्णपदक जिंकले होते.
यावर्षी मे महिन्यात रिओच्या फुफ्फुसांवर शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. कुत्र्याच्या मृत्यूनंतर रूवेन्डालने पोहण्याची सर्व प्रेरणा गमावली. अशा स्थितीत तिच्या वडिलांनी तिला रिओसाठी पुन्हा एकदा पोहण्याची प्रेरणा दिली.
पॅरिसमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर रूवेन्डालेने पत्रकारांशी बोलताना सांगितले की, रिओच्या अंत्ययात्रेनंतर तीन दिवसांनी मी त्याचा टॅटू काढला. मी म्हणाले, 'प्रयत्न करून बघू या आणि मी त्याच्यासाठी मनापासून पोहणार. आणि मी ते केलं. मी त्याच्यासाठी जिंकले. "
रुवेंडलच्या व्हायरल व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी सांगितले की, या स्टोरीमुळे ते भावूक झाले आहेत.
एका युजरने लिहिलं, 'रिलेटेबल. दोन वर्षांपूर्वी जेव्हा मी माझा कुत्रा गमावला, तेव्हा मी माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट शारीरिक स्थितीत होतो. तो गेल्यानंतर मला फिट राहण्याची प्रेरणा मिळाली. माझ्या हातावर त्याचा टॅटू आहे, ज्यात त्याची राख शाईत मिसळली आहे.
एप्रिल मध्ये त्याच्या पुण्यतिथीला मी त्याच्या सन्मानार्थ माझी पहिली १० किमी शर्यत पूर्ण केली.
दुसऱ्या युजरने लिहिले की, "पाळीव प्राणी गमावणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट वेदना आहे, मी रोज त्याचा विचार करतो. "