Swapnil Kusale News : मराठमोळ्या स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये नेमबाजीत कांस्य पदक पदक जिंकले. पण आता या ऑलिम्पिक पदकाचा रंग उडून जात असून त्याची चमक फिकी पडत आहे. यामुळे नेमबाज स्वप्नील कुसळेने शुक्रवारी पदक बदलून देण्याची विनंती केली आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरच्या २९ वर्षीय स्वप्नील कुसळेने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत कांस्यपदक (स्कोअर ४५१.४) जिंकले. विशेष म्हणजे या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय नेमबाज आहे.
दरम्यान, आज स्वप्नीला कुसळे याला राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार मिळाला. स्वप्नीलने या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला, परंतु पॅरिसमध्ये मिळालेल्या पदकाची चमक आता कमी होऊ लागली असल्याचे सांगितले. याआधी नेमबाज मनू भाकर हिनेही पॅरिस ऑलिम्पिक पदकाचा रंग उडाल्याची तक्रार केली होती.
'भाषा'ला दिलेल्या मुलाखतीत स्वप्नील म्हणाला, 'माझ्या पदकाची चमक कमी होत आहे. पॅरिसहून भारतात आल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पदकाचा रंग फिका पडू लागला होता, आता त्या पदकाचा संपूर्ण रंगच निघून गेला आहे. हे पदक बदलण्यासाठी मी भारतीय ऑलिम्पिक संघटनेशी (IOA) बोलणार आहे. ऑलिम्पिक पदक हे खेळाडूसाठी सर्वात मोठे यश आहे आणि ते इतक्या लवकर गमावणे निराशाजनक आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) नुकतेच कबूल केले होते की पॅरिस ऑलिम्पिकमधील पदकांचे रंग उडून जात असल्याबद्दल जगभरातील खेळाडू तक्रार करत आहेत. आयओसीने सांगितले होते की 'खराब झालेले' पदके पद्धतशीरपणे मोनेई डी पॅरिस (फ्रान्सची नॅशनल मिंट) द्वारे बदलली जातील. खेळाडूंना मिळालेले नवीन पदक हे जुन्या पदकाप्रमाणेच असेल.
ऑलिम्पिकच्या रायफल इव्हेंटमध्ये देशासाठी पदक जिंकणारा स्वप्नील हा तिसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी, अभिनव बिंद्राने बीजिंग २००८ मध्ये पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले होते आणि लंडन २०१२ मध्ये याच स्पर्धेत गगन नारंगने कांस्यपदक जिंकले होते.
अर्जुन पुरस्कार जिंकल्यानंतर स्वप्नील म्हणाला की २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये आपल्या पदकाचा रंग बदलण्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे.
संबंधित बातम्या