Swami Samarth Krida Mandal : गेली सुमारे ८० वर्षे कबड्डी या रांगड्या खेळाचा आवाज बनलेल्या प्रभादेवीतील स्वामी समर्थ क्रीडा मंडळाची राजाभाऊ देसाई स्मृतीचषक कबड्डी स्पर्धा पुन्हा एकदा रंगणार आहे. येत्या ८ फेब्रुवारीपासून सुरू होणारी ही स्पर्धा ११ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून त्यात १२ व्यावसायिक संघ सहभागी होणार आहेत. या निमित्तानं दिग्गज कबड्डीपटूंचा चढाई-पकडींचा थरार कबड्डीप्रेमींना अनुभवता येणार आहे.
कबड्डीला प्रो कबड्डीची श्रीमंती लाभण्याआधी कबड्डी आणि कबड्डीपटूंना मान-सन्मान मिळवून देण्यात ८१ वर्षांच्या तरुण तडफदार स्वामी समर्थ क्रीडा मंडळाचा मोठा वाटा आहे. ही परंपरा कायम राखत मंडळानं यंदाही विशेष व्यावसायिक गट कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेत इन्शुअरकोट स्पोर्टस् (युवा पलटन), सेंट्रल बँक, मुंबई महानगर पालिका, रिझर्व्ह बँक, मिडलाईन अॅकॅडमी, एमपीएमसी पुणे, मुंबई पोर्ट ट्रस्ट असे बलाढ्य संघ उतरणार आहेत. चवन्नी गल्लीत उभारलेल्या क्रीडानगरीतील एका मॅटच्या मैदानावर या संघांमध्ये चुरस रंगणार आहे.
कबड्डी संघ आणि कबड्डीपटूंना प्रोत्साहन मिळावं म्हणून या स्पर्धेत विजेत्या संघाला तब्बल १,११,१११ रुपयांचं रोख इनाम दिलं जाणार आहे, अशी माहिती आमदार आणि मंडळाचे प्रमुख कार्यवाह महेश सावंत यांनी दिली. तसंच, उपविजेत्या संघाला ८० हजार रुपये आणि चषक दिला जाणार आहे. एवढंच नव्हे तर उपांत्य सामन्यात पराभूत झालेल्या संघांनाही रोख इनाम देऊन सन्मानित केलं जाणार आहे, असंही सावंत यांनी सांगितलं.
स्पर्धेत एकंदर १२ बलाढ्य संघ खेळणार असून तीन-तीन संघांचे चार गट केले जातील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी एकमेकांशी भिडतील. स्पर्धा अधिक रंजक आणि थरारक व्हावी म्हणून एकाच मॅटवर खेळविली जाणार असून प्रत्येक दिवशी ५ सामने खेळविले जाणार असल्याची माहिती मंडळाचे क्रीडाप्रमुख रवी शिंदे यांनी दिली.
संबंधित बातम्या