मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Suryakumar Yadav : सुर्यकुमार यादवला खेळावच लागणार, नाही तर वर्ल्डकपमधून पत्ता कट होऊ शकतो, पाहा

Suryakumar Yadav : सुर्यकुमार यादवला खेळावच लागणार, नाही तर वर्ल्डकपमधून पत्ता कट होऊ शकतो, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 21, 2023 09:35 PM IST

Suryakumar Yadav : ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत विश्वचषकापूर्वी ही मालिका त्याच्यासाठी एखाद्या परिेक्षेसारखी असणार आहे.

Suryakumar Yadav
Suryakumar Yadav (AFP)

Suryakumar Yadav : टी-20 फॉरमॅटमध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने खळबळ माजवणारा सूर्यकुमार यादव वनडे क्रिकेटमध्ये फ्लॉप ठरला आहे. मात्र, असे असतानाही सूर्यकुमारला टीम इंडियामध्ये सातत्याने संधी मिळत आहेत. तर चांगल्या फॉर्मात असणारा संजू सॅमसन संघाबाहेर आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत विश्वचषकापूर्वी ही मालिका त्याच्यासाठी एखाद्या परिेक्षेसारखी असणार आहे.

सूर्यकुमार यादवला वनडेमध्ये आतापर्यंत एकूण २७ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. या दरम्यान २५ डावांमध्ये फलंदाजीसाठी उतरला आहे, ज्यामध्ये तो केवळ २४.४० च्या सरासरीने अवघ्या ५३७ धावा करू शकला आहे. उलट टी-20 क्रिकेटमधला त्याचा रेकॉर्ड मजबूत आहे. या फॉरमॅटमध्ये सूर्याने ४६.०२ च्या सरासरीने १८४१ धावा केल्या आहेत, ज्यात ३ शतके आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे.

सूर्यकुमार वनडे संघातील स्थान धोक्यात?

एकदिवसीय संघात सूर्यकुमार यादवची भूमिका फिनिशरची आहे. मधल्या फळीतही त्याला संधी देण्यात आली पण तो तिथेही फ्लॉप ठरला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या आधीच्या मालिकेतही तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. या वर्षी मार्चमध्ये झालेल्या त्या मालिकेत सूर्यकुमार यादवला तीन वनडे डावांमध्ये खातेही उघडता आले नव्हते.

पण तरी टीम मॅनेजमेंट त्याला सतत संधी देत आहे. मात्र, तो वनडेमध्ये त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. अशा परिस्थितीत सूर्यकुमारची जागा घेण्यासाठी अनेक खेळाडू रांगेत उभे आहेत, ज्यामध्ये टिळक वर्मा यांचे नाव ठळकपणे समाविष्ट आहे, जो फलंदाजीसोबत गोलंदाजीतही योगदान देऊ शकतो. अशाप्रकारे सूर्यकुमारला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी करता आली नाही, तर त्याचे पत्ते कापले जाणार हे निश्चित आहे.

विश्वचषक संघातूनही बाहेर होऊ शकतो?

५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आयसीसी वनडे विश्वचषकासाठी सूर्यकुमार यादवचाही टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, या स्पर्धेपूर्वी त्याला स्वत:ला सिद्ध करावे लागेल. विश्वचषकापूर्वी भारताचे तीन एकदिवसीय सामने आहेत. यामध्ये जर सूर्यकुमार यादव धावा करू शकला नाही, तर टीम इंडिया त्याच्या जागी आणखी एखाद्या खेळाडूच्या नावावर विचार करू शकते.

विश्वचषक संघात बदल करण्याची अंतिम तारीख २८ सप्टेंबर आहे. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादवलाही याची जाणीव असेल.

WhatsApp channel