csk vs gt ipl final 2023 : आयपीएल 2023 चा हंगाम संपला आहे. जवळपास दोन महिने चाललेल्या या क्रिकेटच्या महाकुंभात ७४ सामने खेळले गेले. महेंद्रसिंह धोनीच्या (ms dhoni) तृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने (CSK) २९ मे (सोमवार) रोजी गुजरात टायटन्सचा (GT) ५ विकेट्सने पराभव करून पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले.
चेन्नईच्या या विजयाचा हिरो डावखुरा फलंदाज रवींद्र जडेजा ठरला. त्याने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. यानंतर आता भारताचे माजी दिग्गज सुनील गावस्कर यांनी या पराभवाबद्दल हार्दिक पांड्याला फटकारले आहे.
एका चॅनलवर बोलताना गावस्कर म्हणाले की, हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकात गोलंदाज मोहित शर्माशी चर्चा करणे अनावश्यक होते. मोहित चांगली गोलंदाजी करत होता. मध्येच येऊन त्याला सल्ला देण्याची काहीच गरज नव्हती, असे गावस्करांनी म्हटले आहे. वेगवान गोलंदाज मोहित शर्मा डावातील शेवटचे षटक टाकत होता. चेन्नईला शेवटच्या षटकात विजयासाठी १३ धावांची गरज होती आणि मोहित शर्माने पहिल्या ४ चेंडूत केवळ ३ धावा दिल्या होत्या. यानंतर सीएसकेचा फलंदाज रवींद्र जडेजाने शेवटच्या २ चेंडूत १ षटकार आणि १ चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.
गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपूर्वी मोहित शर्माशी बोलण्यासाठी पोहोचला, ज्याची काहीच गरज नव्हती,असे सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे.
याशिवाय सुनील गावस्कर म्हणाले की, गोलंदाज जेव्हा लयीत असतो तेव्हा त्याला डिस्टर्ब करू नये. तुम्ही फक्त दुरूनच बोलावे. अनुभवी गावसकर पुढे म्हणाले, “जेव्हा गोलंदाज त्याच्या लयीत असतो आणि मानसिकदृष्ट्याही पूर्णपणे गेममध्ये असतो, तेव्हा त्याला कोणीही काही बोलायला नको होते. त्याच्याकडे जाणे, त्याच्याशी बोलणे या योग्य गोष्टी नव्हत्या.'