
भारताने बांगलादेशविरूद्धची कसोटी मालिका जिंकली. मालिकेतील दुसरा सामना भारताने आज रविवारी (२५ डिसेंबर) जिंकला. मात्र, या सामन्यादरम्यान कॉमेंट्री करत असलेल्या सुनील गावस्कर यांच्यासाठी एक वाईट बातमी आली. त्यांच्या आईचे निधन झाले. गावस्कर यांच्या आईची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून बरी नव्हती. याच कारणामुळे ते आयपीएलच्या गेल्या मोसमात समालोचनासाठी उपस्थित नव्हते. गावस्कर आपल्या आईची काळजी घेण्यासाठी घरी परतले होते.
सुनील गावस्कर यांच्या आई मीनल गावस्कर या ९५ वर्षांच्या होत्या. मुंबईतच त्यांचे निधन झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गावस्कर यांच्या आईचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाशी संबंधित आजारांमुळे निधन झाले. मात्र, भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीही गावसकर यांनी कॉमेंट्रीचे कर्तव्य बजावले. त्यांनी लोकांना त्यांचे दु:ख अजिबात दिसू दिले नाही. दरम्यान दिवसाच्या पहिल्या सत्रातच भारताने हा सामना जिंकला होता.
मीनल गावस्कर या गेल्या वर्षभरापासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होत्या. या वर्षाच्या सुरुवातीला आयपीएलदरम्यान त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आयपीएलसाठी कॉमेंट्री करणाऱ्या गावसकरांना आपल्या आजारी आईला पाहण्यासाठी त्यावेळी बायो-बबलमधून बाहेर पडावे लागले होते.
सुनील गावस्कर हे भारताच्या महान फलंदाजांपैकी एक आहेत. त्यांची कारकीर्द १९७१ ते १९८७ अशी होती. यादरम्यान त्यांनी १२५ कसोटींमध्ये ३४ शतकांसह १०,१२५ धावा केल्या. तसेच, त्यांनी भारतासाठी १०८ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात ३,०९२ धावा केल्या आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पार करणारे गावस्कर जगातील पहिले फलंदाज होते. त्यांनी ४७ कसोटी सामने आणि ३७ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीनंतर, तो समालोचक बनले.
संबंधित बातम्या
