आयपीएलच्या बाराव्या हंगामात पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई किंग्ज एकमेकांना आव्हान देत आहेत. धोनीने नाणेफक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आयपीएलमधील या सामन्यासंदर्भात दोन्ही संघाच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये अनेक तर्कवितर्क सुरु असताना चक्क मद्रासमधील आयआयटीच्या परीक्षेत या सामन्यात धोनीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घ्यावा की गोलंदाजीचा असा प्रश्न विचारण्यात आला होता.
आयसीसीने आपल्या अधिकृत फेसबुकपेजवरुन पेपरमधील प्रश्नाचा फोटो शेअर केला आहे. आयआयटीच्या 'मटेरियल अॅण्ड एनर्जी बॅलेन्स' या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. हवामानाचा अंदाज, आद्रता आणि तापमान या सर्वांच्या माहितीवरुन नाणेफेक जिंकल्यास धोनीने कोणता निर्णय घेणे संघासाठी फायदेशीर ठरेल, अशा आशयाने हा प्रश्न विचारण्यात आला होता.
आयपीएलचा फिव्हर लक्षात घेऊन विद्यार्थ्यांची चाचणी घेणाऱ्या प्राध्यापकाचे अभिनंदन करत तुम्ही धोनीला मार्गदर्शन करा, असा उल्लेख करत आयसीसीने प्रश्नपत्रिकेचा फोटो शेअर केला आहे.