आँटिग्वाच्या मैदानात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विंडीज गोलंदाजांनी भारताच्या आघाडीला सुरुंग लावला. या सामन्यात विंडीजच्या ताफ्यातील केमा रोचनं सलामीवीर मंयक अग्रवाल (५), चेतेश्वर पुजारा (२) आणि हनुमा विहारी ३२ धावांवर तंबूत धाडलं. मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता असलेल्या फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडणाऱ्या केमो रोचनं पहिल्या दिवसाखेर सामन्यात वर्चस्व निर्माण करण्यात संघ यशस्वी ठरल्याचे म्हटले आहे.
सलामीच्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी संघाने चांगली कामगिरी केली. आँटिग्वाची खेळपट्टी सुरुवातीला जलदगती गोलंदाजांना पोशख होती. याचा फायदा उठवत आम्ही चांगली सुरुवात केली. या मैदानावर खेळणे मला नेहमीच आनंददायी वाटते. लोकेश राहुल आणि हनुमा विहारी यांनी चिवट खेळ करत भारताचा डाव सावरल्याचा उल्लेखही त्याने यावेळी केला.
अश्विनऐवजी जडेजाला खेळवण्याबाबत रहाणेनं दिलं स्पष्टीकरण
नाणेफेक जिकून विंडीजने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत भारताच्या आघाडीला सुरुंग लावला.मयंक अग्रवाल अवघ्या ५ धावा करुन परतला. चेतेश्वर पुजारालाही यावेळी मैदानात नांगर टाकणे जमलं नाही. त्याने २ धावांची भर घातली. हनुमा विहारीने ३२ धावांचे योगदान दिले. या तिघांना रोचंनं माघारी धाडले. भारताचा कर्णधार विराट कोहली (९) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेला (८१) गर्बिएलने तंबूचा रस्ता दाखवला. रोस्टन चेसने लोकेश राहुलला ४४ धावांवर बाद केले. पहिल्या दिवसाखेर भारताने ६ बाद २०३ धावा केल्या आहेत. पंत आणि जडेजा भारताच्या धावसंख्येत आणखी किती धावांची भर घालण्यात यशस्वी ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.