राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लवकरच गोड बातमी मिळेल, असे भाष्य करणाऱ्या भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांना संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. राज्यातील राष्ट्रपती राजवट दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. निवडणुकीनंतर भाजपकडून गोड बातमी देण्याची विधाने झाली. मात्र त्यांना सरकार स्थापनेची गोड बातमी देता आली नाही. शिवसेना पक्षप्रमुख लवकरच राज्यातील जनतेला ही गोड बातमी देतील, असे सांगत त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
सोनिया गांधी 'राजी', काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक निर्णायक ठरणार?
काँग्रेस-राष्ट्रवादीची शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक सुरु आहे. या बैठकीमध्ये किमान समान कार्यक्रमावर एकमत झाल्याचे समजते. या बैठकीकडे संजय राऊतही लक्ष ठेवून आहेत. एका बाजूला ही बैठक सुरु असताना दिल्लीतील आपल्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या चेहऱ्यावर एक उत्साह पाहायला मिळाला. गोड बातमी लवकरच मिळणार आहे. पेढ्यांची ऑर्डर दिली असं समजा, अशा शब्दांत त्यांनी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडवणार असल्याचे ते म्हणाले.
...म्हणून शरद पवारही बैठकीला हजर
राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक सुुरु आहे. तीन तासांच्या बैठकीनंतर आघाडीकडून शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी तीन पक्षांचे सरकार येणार असल्याचा दाखला देत आम्ही सरकार स्थापन करणार असल्याचे स्पष्ट असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये काय घडले याची माहिती घेऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा करेन, अशी माहितीही संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.