पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रॉयल्टीचे पैसे न दिल्याने सचिन तेंडुलकरचा ऑस्ट्रेलियातील कंपनीविरुद्ध दावा

सचिन तेंडुलकर

भारताचा मास्टरब्लास्टर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने ऑस्ट्रेलियातील एका कंपनीविरुद्ध तिथे दावा दाखल केला आहे. खेळाच्या वस्तू आणि कपडे निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्पार्टन स्पोर्ट्स इंटरनॅशनल कंपनीविरुद्ध हा दावा दाखल करण्यात आला आहे. आपल्या वस्तूंच्या प्रसिद्धीसाठी सचिन तेंडुलकर याच्या नावाचा आणि फोटोंचा वापर करून त्याबदल्यात निश्चित करण्यात आलेली २० लाख डॉलरची रॉयल्टी न दिल्यामुळे सचिन तेंडुलकरच्या वकिलांकडून दिवाणी दावा दाखल करण्यात आला.

सचिन तेंडुलकरच्या नावाचा आणि फोटोंचा वापर करण्यासाठी स्पार्टन कंपनीने त्याला प्रतिवर्ष किमान दहा लाख डॉलर देण्याचे २०१६ मध्ये ठरविले होते. दोघांमध्ये तसा करारही झाला होता. त्यामुळे सचिन या कंपनीच्या वस्तूंच्या प्रमोशनसाठी तयार झाला. तो कंपनीच्या विविध प्रमोशनल कार्यक्रमात सहभागीही झाला. लंडन आणि मुंबईमध्ये हे कार्यक्रम झाल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होते. 

पुण्यातील सायकल योजना बंद पडण्याच्या मार्गावर, मोबाईकची माघार

दरम्यान, सप्टेंबर २०१८ पर्यंत देय असलेला एकही डॉलर कंपनीकडून सचिन तेंडुलकरला देण्यात आला नाही, असे त्याने म्हटले आहे. त्याने ठरलेली रक्कम देण्यासाठी औपचारिकपणे कंपनीकडे मागणी केली. पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर आपल्या नावाचा आणि फोटोंचा वापर करणे बंद करावे, असे कंपनीला कळवून टाकले. त्यानंतरही स्पार्टनकडून सचिनच्या नावाचा आणि फोटोंचा वापर करणे सुरूच राहिले. त्यानंतर हा दावा दाखल कऱण्यात आला.

या संदर्भात रॉयटर्स या वृत्तसंस्थेने स्पार्टन कंपनीला त्यांची बाजू ऐकण्यासाठी मेल पाठविला होता. त्याला त्यांनी कोणतेच उत्तर दिलेले नाही.