पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BLOG : पंतच्या प्रेमापोटी बीसीसीआयचा नवा प्रयोग

ऋषभ पंत

बीसीसीआयने एकेकाळी सहाव्या फलंदाजाची जागा भरुन काढण्यासाठी कित्येक विकेटकिपर फलंदाजांच्या करिअरला ब्रेक लावला. अनिल कुंबळेंचा चेंडू लागून जायबंदी झालेला नयन मोंगिया संघातून बाहेर पडला तेव्हापासून धोनी संघात येईपर्यंत भारतीय विकेटमागचा काळ हा दुष्काळाचा होता. सचिन, सौरव, अझरुद्दीन, अजय जडेजा अशी तगडी फलंदाजी असतानाही बीसीसीआयने द्रविडला बळजबरीनं विकेटमागे उभे करण्याचा प्रयोग राबवला. द्रविडनं ते सहन केलं, पण त्याच्या वेदना झेलल्या त्याकाळात यष्टिमागे उभे राहून भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी धडपडणाऱ्या साबा करिम, विजय दाहिया, समीर दिघे, दिप दासगुप्ता, अजय रात्रा या मंडळींनी. 

पंतला सुधारण्यासाठी बीसीसीआय काही करायला तयार

द्रविडच्या प्रयोगानंतर पार्थिव पटेल सर्वात कमी वयात भारतीय संघाचे प्रतिनीधीत्व करण्याची संधी मिळाली, पण धोनीच्या चढत्या ग्राफने पटेल त्याच्या उंचीसारखा कधी खुजा ठरला ते कळलंही नाही. बीसीसीआयचे प्रयोग म्हणजे महाराष्ट्रात घडलेल्या राजकारणासारखे बुचकळ्यात टाकणारे आणि भाजपसारखे आपल्या निर्णयावर ठाम असणारे असतात. धोनीचा वारसदार म्हणून सध्या ऋषभ पंतकडे पाहिले जात आहे. बीसीसीआय निवड समितीने पंतवर असा शिक्का मारलाय की त्याला आम्ही तयार केल्याशिवाय सोडणार नाही. तो एवढा लाडका का? हे बीसीसीआयला विचारण्याचे धाडस कोण करणार नाही आणि केलेच तर त्याचा काही परिणामही होणार नाही.

INDvsWI: झिरोवर बाद झालेल्या पंतविरोधात उमटल्या संतप्त प्रतिक्रिया

आगामी वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या दोन मालिकेसाठी विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची नुकतीच घोषणा झाली. सरत्यावर्षाप्रमाणे आगामी वर्षातही बीसीसीआय पंतवर प्रेमाचा वर्षाव सुरु ठेवणार याचे संकेत बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिले. पंतमध्ये क्षमता आहे हे मान्य पण म्हणून इतरांकडे दुर्लक्ष करुन कसे चालेल? हा देखील विचार कुठे तरी करायला हवा. बीसीसीआयने  सरत्या वयात दमदार कामगिरी करणाऱ्याला अधिक संधी देण्याचा प्रयोगही एकदा करुन बघावा असे वाटते. (विश्वचषकात दिनेश कार्तिकला आजमावले तसे)  एमएसके प्रसाद यांनी भारतीय संघाकडून मोजके सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी यष्टिमागची जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे त्यांना इतर यष्टिरक्षक फंलदाजांच्या भावना अधिक समजू शकतील. त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली नाही तर वृद्धिमान साहा, संजू सॅमसन, केएस भारत ही मंडळी झाकोळले जातील.

INDvsWI T20 : पंतला संधी मिळणार का? विराटनं दिलं सॉलि़ड उत्तर

दुखापतीनंतर वृद्धिमान साहाने कसोटी संघात पुनरागमन केले. पण प्राधान्य पंत असल्यामुळे त्याला फारशी संधी मिळाली नाही. आगामी काळात त्याला संधी मिळण्याचे संकेतही दिसत नाहीत.  सध्याच्या घडीला संजू सॅमसन आणि केएस भारत हे नव्या दमाच्या यष्टिरक्षकांमध्ये पंतसमोर मोठे आव्हान उभे करण्याची क्षमता आहे. पण त्यासाठी त्यांच्या नावाचा विचार व्हायला तरी हवा. पंतच्या प्रेमापोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी यानंतर आता यष्टिरक्षकासाठी स्वतंत्र प्रशिक्षकाची कल्पना उदयास येत आहे. पंतसाठी विशेष यष्टिरक्षक प्रशिक्षक निवडण्याच्या निर्णयापर्यंत पोहचलेली बीसीसीआय उद्या सलामीवीर अन् मध्यफळीतील फलंदाजांसह अष्टपैलू खेळाडूसाठी विशेष प्रशिक्षक निवडण्याचा प्रयोग करणार का? असा हास्यास्पद प्रश्नही यामुळे उपस्थित करावाचा वाटतो. इतक्या वरच्या स्तरावर प्रशिक्षण गरजेचं नाही हे शास्त्रीचं म्हणणं आहे. इथं फक्त व्यवस्थापन करावे लागते असं ते म्हणाले होते.  मग पंतला प्रशिक्षण देण्याइतका तो बालिश आहे का? जर असेल तर बालहट्ट पुरवण्यापेक्षा दुसरा परिपक्व घ्या. आणि बालकाला प्रशिक्षण घेऊन येण्याचा सल्ला द्यायला पाहिजे.

            सुशांत जाधव
Sushantjournalist23@gmail.com

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Rishabh Pant set for a stint under a specialist wicket keeper coach special blog on bcci msk prasad big statment