पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आशियाई बॅडमिंटन स्पर्धा:सिंधू, समीर उपांत्यपूर्व फेरीत

पी.व्ही. सिंधू

रिओ ऑलिम्पिक चॅम्पियन पी. व्ही. सिंधू आणि समीर वर्मा या भारताच्या बॅडमिंटनपटूंनी आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या उपांत्य पूर्व फेरीत धडक मारली आहे. गुरुवारी रंगलेल्या सामन्यात महिला बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या सिंधूने अवघ्या ३३ मिनिटात इंडोनेशियाच्या चौरोनिसाला २१-१५, २१-१९ अशा फरकाने सरळ सेटमध्ये पराभूत केले. स्पर्धेत चौथ्या मानांकन मिळालेल्या सिंधूची उपांत्यफेरीतील लढत ही  चीनच्या बिगर मानांकित काई यानयान हिच्याविरुद्ध होणार आहे. 

पुरुष एकेरीमध्ये समीर वर्माने हाँकाँगच्या अँग का लाँग अँगसला २१-१२, २१-९ असे सरळ सेटमध्ये पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याला पुढील फेरीत थायलंडचा सिथिकोम थॅमसिन आणि इंडोनेशियन ग्लोरिआ एम्युले विडजाजा यांच्यातील विजेत्याचे आव्हान असेल. महिला एकेरीमध्ये आज सायना नेहवाल आपल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात दक्षिण कोरियाच्या किम गा युन हिच्याशी दोन हात करणार आहे. 

यापूर्वी किदम्बी श्रीकांतचे आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान बुधवारी पहिल्याच फेरीत संपुष्टात आले होते. आता पुरुष एकेरीत समीर वर्मा आणि महिला एकेरीमध्ये सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यावर भारताची मदार आहे. महिला एकेरीत सिंधू आणि सायनाला प्रबळ दावेदार मानले जात आहे. यंदाच्या स्पर्धेत विक्रमी खेळी करुन बॅडमिंटनच्या कोर्टवर दोघींपैकी कोण नवा इतिहास रचणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.