पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये धडक

पी. व्ही. सिंधू

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील उपांत्य सामन्यात ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने चीनच्या शेन युफेईला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली. सलग तिसऱ्यांदा ती या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचली आहे. मागील दोन वेळा तिला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली होती. यंदाच्या स्पर्धेत ती सोनेरी कामगिरीसह पराभवाची हॅटट्रिक टाळण्याच्या इराद्यानेच कोर्टवर उतरेल. उपांत्य फेरीत सिंधूने चीनच्या शेन युफेईला २१७, २१-१४ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. 

रिओ ऑलिम्पिकमधील रौप्य पदक विजेत्या सिंधूने पहिल्या सेटपासून आक्रमक खेळ करत चीनी खेळाडूला दबावात टाकले. अवघ्या १५ मिनिटांत सिंधून पहिला सेट आपल्या नावे केला. पहिल्या सेटमधील ब्रेकपर्यंत सिंधूने ११-३ अशी मजबूत आघाडी मिळवली होती. ब्रेकनंतर सिंधूने आपल्या खात्यात आणखी ३ पॉइंट्सची भर घातली. ज्यावेळी सिंधू १४-३ अशा आघाडीवर होती त्यावेळी चीनी शेन युफेईने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला फारसा प्रभाव टाकता आला नाही. सिंधूने २१-७ अशा फरकाने पहिला सेट आपल्या नावे केला. दुसऱ्या सेटमध्ये चीनी शे युफेईने १४ पॉइंटसपर्यंत मजल मारली. पण तिला सामना तिसऱ्या सेटमध्ये नेता आला नाही. 

अंतिम सामन्यात सिंधूसमोर दुसऱ्या उपांत्य फेरीतील इंडोनेशियाच्या इतानोन रतचानोक आणि जापानच्या नोजोमी ओकुहारा यांच्यातील विजेत्याचे आव्हान असणार आहे.