मायदेशात होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. मानसिक आजाराने त्रस्त असल्याने अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून विश्रांती घेतली. क्रिकेटचे वेगाने बदलणारे प्रारुप, सातत्यपूर्ण होणाऱ्या स्पर्धामुळे खेळांडूवरील तणाव वाढत आहे. मानिसिक आजाराचा शिकार झालेला मॅक्सवेल पहिला क्रिकेटर नाही. यापूर्वीही काही खेळाडूंना अशा प्रकारे मैदान सोडावे लागले आहे.
रयान कॅम्पबेल (ऑस्ट्रेलिया):
एक खेळाडूच्या रुपात ऑस्ट्रेलियन मजबूत आणि दमदार असतात. पण थकवा आणि डिप्रेशन हाताळण्यात ते कमजोर असल्याचे दिसून येते. ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय संघात दोन एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधीत्व केलेल्या यष्टिरक्षक रयान कॅम्पबेल यांनाही डिप्रेशनमुळे क्रिकेटचे मैदान सोडावे लागले होते. रयान यांना २००१ मध्ये मानसिक आजार असल्याचे समजले. उपचारानंतर त्यांनी दुसऱ्या खेळाडूंना या फेजमधून बाहेर काढण्यासाठी मदत करण्यास सुरुवात केली.
मार्कस ट्रेस्कोथिक (इंग्लंड):
इंग्लंडचा माजी सलामीवीर ट्रेस्कोथिक एक लोकप्रिय खेळाडू होता. त्याच्या खेळी आणि मैदानातील आत्मविश्वास पाहता त्यालाही कधी डिप्रेशनचा फटका बसेल असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र, २००६ च्या भारत दौऱ्यानंतर ट्रेस्कोथिकला मानसिक तणावामुळे अस्वस्थ असल्याचे जाणवले. यातून बाहेर पडण्याचा त्याने खूप प्रयत्न केला. पण मानिसिक आजाराने त्याच्या चांगल्या कारिकिर्दीला पूर्णविराम लावला.
मायकल यार्डी (इंग्लंड):
इंग्लंडच्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघांतील सदस्य मायकल यार्डीला देखील मानसिक आजाराने क्रिकेटचे मैदान सोडावे लागले. वजन वाढणे, चिडचिडेपण या समस्येमुळे तो हैराण झाला होता. संघातून स्थान गमावल्यानंतर त्याच्या तणावात आणखी भर पडली. संघाचे प्रशिक्षक मुश्ताक अहमद यांनी त्याची समस्या समजून घेत त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.
शॉन टेट (ऑस्ट्रेलिया):
ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज शॉन टेटला देखील मानसिक आजाराता सामना करावा लागला होता. १५० किमी/तास वेगाने चेंडू टाकण्याची क्षमता असणाऱ्या खेळाडूला यामुळे संघातून आत-बाहेर असा प्रवास सुरु झाला. डिप्रेशनची लक्षणे जाणवल्यानंतर त्याने काही काळासाठी क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तो केवळ टी-२० मध्येच खेळू लागला.
जॉनथन ट्रोट (इंग्लंड):
मूळचा दक्षिण आफ्रिकेचा असणाऱ्या ट्रोटने इंग्लंडकडून क्रिकेट खेळताना आपल्या नावाचा एक दबदबा निर्माण केला होता. खराब कामगिरी आणि संघात स्थान मिळवण्यातील अपयशानंतर त्याला मानसिक आजारात अधिक भर पडली. याचा त्याच्या खेळावर परिणाम झाला.