पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुपर ओव्हर : पांड्याकडून शेवटच्या चेंडूवर दिलेल्या षटकाराची परतफेड!

हार्दिक पांड्या आणि पॉलार्ड

मुंबईच्या वानखेडे मैदानावर गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात रोमहर्षक लढत पाहायला मिळाली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने सलामीवर क्विंटन डी कॉकच्या नाबाद ६९ धावांच्या जोरावर निर्धारित २० षटकात ५ बाद १६२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हैदराहादच्या गप्टील-साहा जोडीने ४० धावांची भागिदारी करत चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर मनिष पांडेने सर्व सुत्र आपल्या हाती घेतली. दुसऱ्या बाजूने कर्णधार केनविल्यमसन (३), विजय शंकर (१२) आणि अभिषेक शर्मा (२) अवघ्या दोन धावांची भर घालून तंबूत परतले असताना पांडेने मोहम्मद नबीच्या साथीने सामन्यात रंगत निर्माण केली.

अखेरच्या षटकात सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी १७ धावांची आवश्यकता होती. रोहित शर्माने चेंडू हार्दिक पांड्याच्या हाती दिला. पहिल्या दोन चेंडूवर प्रत्येकी एक धाव देत पांड्याने हैदराबादच्या फलंदाजांवरील दबाव वाढवला. तिसऱ्या चेंडूवर नबीने उत्तुंग षटकार लगावत हैदराबादच्या आशा पुन्हा पल्लवीत केल्या. चौथा चेंडू पुन्हा सीमारेषेबाहेर तडकवण्याच्या नादात तो झेलबाद झाला. सामना जिंकण्यासाठी हैदराबादला २ चेंडूत ९ धावांची आवश्यकता होती. मुंबईकरांच्या नजरा या गोलंदाजीला असणाऱ्या पांड्यावर खिळल्या होत्या तर हैदराबादचे चाहते मनिष पांडेवर आस लावून बसले होते. पाचव्या चेंडूवर दोन धावा देत पांड्याने स्ट्राइकवर असलेल्या मनिष पांडेवर दबाव कायम ठेवण्यात यश मिळवले. अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत मनिष पांडेने सामना बरोबरीत सोडवण्याचा पराक्रम करुन निकाल सुपर ओव्हरमध्ये नेण्यात यशस्वी ठरला. 

सुपर ओव्हरमध्ये हैदराबादच्या फलंदाजांना केवळ ८ धावा उभारता आल्या. हे आव्हान परतवून लावताना कर्णधार रोहित शर्माने पुन्हा हार्दिक पांड्यावरच विश्वास दाखवला. पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून हैदराबादच्या आशेवर पाणी फिरवले. पांडेने मारलेल्या षटकाराची पांड्याने परतफेड केली. त्यानंतर त्याने एक धाव घेत पोलार्डला स्ट्राइक दिले. पोलार्डने दोन धावा घेत सुपर विजयासह मुंबईचे प्लेऑफमधील स्थान निश्चित केले. 

यंदाच्या आयपीएलमध्ये सुपर ओव्हरची दुसऱ्यांदा अनुभूती आली असून २००८ पासून आतापर्यंत आयपीएलमध्ये नऊ वेळा सुपर ओव्हरचा थरार रंगल्याचे पाहायला मिळाले आहे. २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आलेल्या स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात केपटाऊनमध्ये रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाल होता. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये गेलेले सामने खालील प्रमाणे 

# किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई (चेन्नई, २०१०)
# सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स (हैदराबाद, २०१३)
#रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स (बंगळुरु, २०१३)
# राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (आबूधाबी,२०१४)
#किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स (अहमदाबाद,२०१५)
#मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात लायन्स (राजकोट, २०१७)
#दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (दिल्ली, २०१९)