ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिलांनी पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनी भारतीय महिला मेलबर्नच्या मैदानात पहिला विश्वचषक उंचावण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. भारतीय संघाची माजी कर्णधार आणि टी-२० क्रिकेटमधून निवृती घेतलेल्या मिताली राजने हटके अंदाजात संघाला प्रोत्साहन दिले आहे. भारतीय संघाने विश्वविजेतेपद पटकावून मायदेशी परतावे, अशा आशयाचा संदेश देणारा व्हिडिओ मितालीने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये ती चक्क साडी नेसून क्रिकेट खेळताना दिसत आहे.
ICC W T20 WC : हरमनप्रीत ब्रिगेडला 'विराट' शुभेच्छा!
मितालीने शेअर केलेल्या प्रमोशनल व्हिडिओनंतर ट्विटरवर #MithaliPlaysCricketInSaree ट्रेंड पाहायला मिळाला. याशिवाय मितालीने एका ट्विटच्या माध्यमातून भारतीय महिला संघाचे अभिनंदनही केले आहे. पावसामुळे इंग्लंडवर आलेली परिस्थिती मी समजू शकते. अशी परिस्थिती आपल्या संघावर येऊ नये, असेही तिने म्हटले आहे. मिताली राजने काही दिवसांपूर्वीच टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीनवेळा विश्वचषकाची सेमीफायनल खेळली होती. यंदाच्या स्पर्धेत भारतीय महिला संघाने हा अडथळा बाजूला करत फायनल गाठली आहे.
ICC T20 World Cup : भारतीय महिला संघाची अंतिम फेरीत धडक
यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघाने साखळी सामन्यात सर्वच्या सर्व ४ सामने जिंकले. त्यामुळे सेमीफायनलचा सामना रद्द झाल्यानंतर गुणतालिकेतील अव्वलस्थानामुळे महिला टीम इंडियाने अंतिम फेरीत प्रवेश केला. ८ मार्च रोजी महिला दिनी भारतीय संघ आपली ताकद दाखवून पहिला वहिला विश्वचषक जिंकावा, ही मितालीची भावना भारतीय संघ पूर्ण करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.