राज्यातील प्रतिष्ठित कुस्तीस्पर्धा समजली जाणाऱ्या महाराष्ट्र केसरीचे मैदानात मारलेल्या कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीरने सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मंत्रालयात झालेल्या या भेटीत उद्धव ठाकरे यांनी नव्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या मानकऱ्याचे अभिनंदन केले. तसेच भविष्याच्या वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या.
भावा कुस्तीत दोस्ती नाय अन् कुस्तीनंतर अशी दोस्ती पण दिसायची नाय!
नाशिकचा कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीरने पुण्यातील बालेवाडीत पार पडलेल्या ६३ व्या कुस्ती स्पर्धेत लातूरच्या शैलेश शेळकेवर ३-२ ने विजय मिळवत मानाची स्पर्धा जिंकली होती. अंतिम सामन्यात त्याने विजयी मिळवल्यानंतर उपविजेत्या शैलेशला खांद्यावर घेऊन आनंद साजरा केला होता. त्याच्या या खिलाडूवृत्तीची चांगलीच चर्चा राज्यभरात रंगल्याचे पाहायला मिळाले होते. कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मिळालेली मानाची गदा घेऊन मंत्रालयात दाखल झालेल्या हर्षवर्धनसोबतचा फोटो मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर नवा महाराष्ट्र केसरी!
ट्विटरवरुन शेअर केलेल्या फोटोवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. राज्य सरकारने कुस्तीचे वैभव परत मिळवून आणावे. राज्यात ठिकठिकाणी तालीम उभारण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. कुस्तीचे आखाडे पुन्हा एकदा राज्यात भरतील यादृष्टीने सरकारने पाऊले उचलावी, अशा आशयाच्या प्रतिक्रिया या फोटोवर उमटताना दिसत आहेत.
यंदाचा #महाराष्ट्रकेसरी किताब पटकावलेल्या कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर यांनी आज मंत्रालयात घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट. हर्षवर्धन सदगीर यांनी मिळविलेल्या यशाबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा pic.twitter.com/CYSYqevk1f
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 13, 2020