पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य कमी आणि असुरक्षितता अधिक आहे. यामुळे पाकिस्तानात राहणे हे नैराश्यवादात ढकलण्यासारखे आहे, असे वक्तव्य पाकिस्तान क्रिकेटचे माजी फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर यांनी केले आहे. झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू असलेले ग्रँट फ्लॉवर हे २०१४ पासून पाकिस्तानी टीमचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. मागील आठवड्यात पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) त्यांचा करार वाढवण्यास नकार दिला.
एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ग्रँट यांनी पाकिस्तानी टीमबरोबरील आपले अनुभव शेअर केले. पाकिस्तानमध्ये राहत असताना सर्वांत नैराश्यवादी प्रसंग कोणता असा प्रश्न विचारला असता, त्यांनी सुरक्षा आणि स्वातंत्र्याचा अभाव, असे उत्तर त्वरीत दिले.
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा रवी शास्त्रींची निवड
वर्ष २००९ मध्ये पाकिस्तानी दौऱ्यावर आलेल्या श्रीलंकन संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर जगातील खूपच कमी संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले आहेत.
वर्ष २०१७ मध्ये पाकिस्तानी संघाला चॅम्पियन्स चषकाचे विजेतेपद मिळवून देणे हे आपल्या प्रशिक्षण काळातील सर्वांत मोठे यश असल्याचे त्यांनी म्हटले.
पाकिस्तानातील कोणती गोष्ट पुन्हा आठवू इच्छित नाही, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, माजी खेळाडूंकडून पाठीत खुपसलेला खंजीर आणि टीव्ही वाहिन्यांच्या मागे खेळण्यात येत असलेले राजकारण, या दोन गोष्टी कधीच आठवू इच्छित नाही, असे ते म्हणाले.