आयपीएल स्पर्धेतील ४३ व्या सामन्यात कोलकता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चुरसीची लढत पाहायला मिळाली. ईडन गार्डनच्या मैदानात झालेल्या सामन्यात पाहुण्या राजस्थान रॉयल्सने ३ गडी राखून रोमहर्षक विजय नोंदवला. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने निर्धारित २० षटकात ६ बाद १७५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना राजस्थानच्या १७ वर्षीय रियानने धमाकेदार खेळी केली. मात्र, सामना आवाक्यात आल्यावर तो अतिशय वाईट पद्धतीने बाद झाला. त्याची विकेट पाहून राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथही आश्चर्यचकित झाला.
सामना अगदी रंगतदार स्थितीत असताना १९ व्या षटकात षटकार खेचत रियाननं सामना राजस्थानच्या बाजून झुकवला. पण आंद्रे रसेलच्या एका उसळत्या चेंडूवर यष्टीमागे चौकार टोलवण्याच्या नादात तो हिट विकेट झाला. रसेलचा चेंडू रियानसह यष्टिरक्षक दिनेश कार्तिकलाही चकवा देत सीमारेषेपलीकडे निघून गेला. यावेळी पंच इयान गोल्ड घाईगडबडीत चौकार देऊन मोकळेही झाले. पण नंतर लक्षात आले की, रियान हिट विकेट झाला आहे. तिसऱ्या पंचांनी रियानला बाद घोषित केल्यानंतर त्यांनी माफी मागितली.
M43: KKR vs RR – Riyan Parag Wicket https://t.co/6x9ACYjFUr
— amit kumar (@amitkum66253697) April 25, 2019
देशांतर्गत सामन्यात आसामकडून प्रतिनिधीत्व करणारा अष्टपैलू रियान पराग आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. फलंदाजीसह त्याने आपल्या गोलंदाजीनेही प्रभावित केले आहे. तो विकेट घेण्यात फारसा यशस्वी ठरत नसला तरी प्रतिस्पर्धी संघाच्या धावगतीवर अंकुश ठेवण्यात त्याला यश मिळताना दिसतय. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ४ सामन्यात २७.५० च्या सरासरीने ११० धावा केल्या आहेत. यात नाईट रायडर्सविरुद्धच्या ३१ चेंडूतील ४७ धावांची खेळी आणि मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यातील २९ चेंडूतील ४३ धावांच्या महत्त्वपूर्ण खेळीचा समावेश आहे. त्याने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने १४ चेंडूत १६ धावा केल्या होत्या.