पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL2019, CSKvsDC: जाणून घ्या आकड्यांच्या खेळातील 'बाजीगर' कोण?

श्रेयस अय्यर आणि महेंद्रसिंह धोनी

युवांनी भरलेला दिल्ली कॅपिटल्स आणि अनुभवी चेन्नई सुपर किंग्ज हे दोन संघ शुक्रवारी आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. स्पर्धेतील सातत्यपूर्ण चांगल्या कामगिरीमुळे चेन्नईचा आत्मविश्वास उंचावलेला आहे तर दुसरीकडे अनुभवी ताफ्यावर मात करुन नवा इतिहास रचण्यासाठी दिल्लीचे शिलेदार प्रयत्नशील असतील. पहिल्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी दिल्ली पुढे चेन्नईचे मोठे आव्हान आहे. साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात दिल्लीला पराभूत करुन चेन्नईने प्ले ऑफमध्ये दुसरे स्थान पटकावले होते. 

बुधवारी शेवटपर्यंत रंगतदार झालेल्या एलिमिनेट राउंडमध्ये ऋषभ पंतच्या फटकेबाजीच्या जोरावर हैदराबादला नमवून दिल्लीचा संघ आयपीएलच्या सेमीफायनलमध्ये ( दुसरी क्वालिफाय ) पोहचला आहे. चेन्नई विरुद्धच्या सामन्यातही पंतकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.  

दोन्ही संघाची स्पर्धेतील कामगिरी

चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएलमध्ये झालेल्या २० सामन्यात  चेन्नईने तब्बल १४ वेळा तर दिल्लीने फक्त ६ सामन्यात विजय मिळवला आहे. आकडे चेन्नईच्या बाजूने असले तरी सध्याच्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघात उलटफेर करण्याची क्षमता आहे.

चेन्नईने तीनवेळा उंचावला आहे चषक

आयपीएलच्या आतापर्यंतच्या हंगामात चेन्नईने तब्बल तीनवेळा चषक उंचावला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाला या आकड्यांचाही फायदा निश्चितच होईल. दुसरीकडे दिल्लीने २०१२ नंतर प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले आहे. त्यामुळे चेन्नई विरुद्धच्या सामन्यात उलटफेर करुन दिल्ली क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. चेन्नईने २०१०, २०११ आणि मागील वर्षी २०१८ मध्ये आयपीएल चषकावर नाव कोरले आहे.

  नावासह संघाची कामगिरी बदलली

बाराव्या हंगामात दिल्ली डेअरडेव्हिल्स हे नाव बदलून दिल्ली कॅपिटल्स नावाने उतरलेल्या दिल्लीने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी नोंदवली. साखळी सामन्यात त्यांनी १४ पैकी ९ सामने जिंकत गुणतालिकेत तिसऱ्या स्थान पटकावले होते. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीचा चेहरा मोहरा बदलला आहे.  

खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन

विशाखापट्टणमचे डॉ. वाय राजशेखरेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट मैदान फलंदाजासाठी अनुकूल आहे.  त्यामुळे दिल्लीच्या फलंदाजांना  इमरान ताहिर आणि हरभजन सिंग यांच्या फिरकीपासून थोडा फार दिलासा मिळेल. दुसरीकडे चेन्नईचा संघ दबावात खेळण्यामध्ये माहिर आहे. त्यामुळे दिल्लीला मैदान मारणे सहज आणि सोपे मुळीच नाही.  

धोनी विरुद्ध श्रेयस

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नईकडून सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम हा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावे आहे.  धोनीने दिल्ली विरुद्ध ५२० धावा केल्या आहेत. दुसरीकडे चेन्नई विरुद्ध सर्वाधिक धावा करण्यात दिल्लीकडून कर्णधारच आघाडीवर आहे. श्रेयस अय्यरने चेन्नईविरुद्ध सर्वाधिक १७१ धावा केल्या आहेत.

ड्वेन ब्रावो विरुद्ध अमित मिश्रा

दिल्ली कॅपिटल्सच्या विरुद्ध चेन्नईकडून सर्वाधिक विकटे घेण्यात ड्वेन ब्रावो आघाडीवर आहे. दिल्ली विरुद्ध खेळताना त्याने ११ विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे अमित मिश्राने सर्वाधिक चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. त्याच्या नावे ८ विकेटस् आहेत.

लवकरच भारतीय क्रिकेटर्स संघटनेची स्थापना होणार
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: ipl 2019 qualifier 2 csk vs dc head to head records results of chennai super-kings vs delhi capitals encounters