पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्लेऑफच्या दोन जागेसाठी पाच संघात स्पर्धा

रोहित शर्मा

आयपीएल स्पर्धेची रंगत आता शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपली आहे. यंदाच्या बाराव्या हंगामात अनुभवी चेन्नई सुपर किंग्ज आणि युवांनी बहरलेल्या दिल्ली कॅपिटल्सने प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. त्यानंतर आता दोन स्थानांसाठी पाच संघात स्पर्धा रंगणार आहे. 
 

मुंबई इंडियन्स

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात पराभूत झाल्याने रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या बाद फेरीतील प्रवेश ( प्ले ऑफ) लांबला आहे. सध्याच्या गुणतालिकेत १२ सामन्यातील सात सामन्यात विजय मिळवत मुंबईने १४ गुणांची कमाई केली आहे. उर्वरित दोन सामन्यातील एक सामना जिंकून प्ले ऑफमधील आपले स्थान निश्चित करण्यासाठी हा संघ प्रयत्नशील असेल. दोन्ही सामन्यात विजय मिळवला तर त्यांना अव्वल स्थानावरही पोहचता येईल.

सनरायझर्स हैदराबाद 

सनरायझर्स हैदराबादने आतापर्यंत खेळलेल्या १२ सामन्यातील ६ सामने जिंकत १२ गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत. त्यामुळे स्पर्धेतील आपले आव्हान टिकवून ठेवण्यासाठी त्यांना उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवावा लागेल. जर त्यांना एकच सामना जिंकता आला तर त्यांना कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब  आणि राजस्थान रॉयल्स यांच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल. हे तिन्ही संघ उर्वरित सर्व सामन्यात पराभूत झाले तर हैदराबादला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याची संधी असेल. या संघातील स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने विश्वचषकाच्या पाश्वभूमीवर पुढील सामन्यातून माघार घेत मायदेशी परतला असल्यामुळे हैदराबादसमोर दोन्ही सामन्यात विजय मिळवणे मोठे आव्हान असेल.

कोलकाता नाईट रायडर्स

सध्याच्या गुणतालिकेत कोलकाता नाईट रायडर्स बॅकफूटवर आहे. त्यांना १२ सामन्यात केवळ १० गुण मिळाले आहेत. दोन्ही सामने चांगल्या फरकाने जिंकून ते स्पर्धेतील आव्हान हे जर-तरच्या समीकरणावर अवलंबून असेल. दोन्ही सामने जिंकल्यानंतर त्यांच्या खात्यात १४ गुण जमा होतील. म्हणजेच दोन्ही सामने जिंकूनही  इतर संघामध्ये होणाऱ्या  सामन्यांच्या निकालावरुनच त्यांचे भवितव्य ठरेल.
 

किंग्ज इलेव्हन पंजाब
 

अश्विनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबने आतापर्यंत खेळलेल्या १२ सामन्यातील ५ सामने जिंकत १० गुण प्राप्त केले आहेत. फक्त उर्वरित दोन सामने जिंकून त्यांच्या प्ले ऑफमधील मार्ग सुकर होणार नाही. दोन्ही सामन्यातील विजयानंतर जर मुंबई इंडियन्सने दोन्ही सामने गमावले आणि हैदराबादला एका सामन्यात पराभव पत्कारावा लागला तर पंजाबला रनरेटच्या जोरावर स्पर्धेतील आव्हन कायम ठेवता येईल.

राजस्थान रॉयल्स

राजस्थान रॉयल्सला प्ले ऑफचा मार्ग फारच कठीण आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या १२ सामन्यातील ५ सामने जिंकत १० गुणांची कमाई केली आहे. त्यांनाही स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकून १४ गुणांसह रनरेट देखील चांगले ठेवण्यावर भर द्यावा लागेल. हैदराबादने दोन्ही सामने गमावले आणि किंग्ज इलेव्हन आणि कोलकाता नाईट रायडर्सने आपला प्रत्येकी एक सामना गमावला तर राजस्थानच्या आशा पल्लवित होऊ शकतात.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरने यंदाच्या स्पर्धेतही निराशजनक कामगिरी केली. आतापर्यंत झालेल्या १२ सामन्यात संघाने केवळ ४ सामने जिंकून ८ गुण कमावले आहेत. गुणतालिकेत विराटचा संघ सर्वात तळाला आहे. त्यांचे आव्हन जवळ-जवळ संपुष्टात आले असले तरी क्रिकेट सारख्या अनिश्चिततेच्या खेळात काहीही शक्य होऊ शकते. उर्वरित दोन्ही सामने जिंकत बंगळुरु संघ १२ गुणांवर पोहचल्यानंतर इतर संघाच्या निकालामुळे त्यांनाही एक संधी निर्माण होऊ शकते. मुंबईने हैदराबादला पराभूत केलं आणि किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांनी आपल्या दोन्ही सामन्यापैकी प्रत्येकी एक सामना गमावला तर त्यांना संधी मिळू शकते. यासाठी बंगळुरुला दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. पण हे गणित त्यांच्यासाठी अशक्यप्राय असेच आहे.