पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आयपीएलमध्ये क्षेत्ररक्षणातील गैरप्रकारांवर मोहमंद कैफचे नेमके बोट

आयपीएल २०१९ (संग्रहित छायाचित्र)

सध्या आयपीएलचा हंगाम आहे. क्रिकेटप्रेमी दुपारनंतर एकतर टीव्हीसमोर बसून किंवा मैदानावर जाऊन आयपीएलच्या सामन्यांचा आनंद लुटतात. पण आयपीएलमधील गैरप्रकार हे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत आहेत. आता तर दिल्ली कॅपिटल्सचा सहायक प्रशिक्षक मोहंमद कैफ यानेच सामन्यावेळी मैदानावर सातत्याने क्षेत्ररक्षक बदलण्याच्या मुद्द्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर पंचानी यामध्ये लक्ष घालण्याची मागणी केली.

भारतीय संघामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून मोहंमद कैफचे नाव होते. सध्या तो दिल्ली कॅपिटल्सच्या टीमचा भाग आहे. त्याने मैदानावरील हालचालींवर बारीक नजर ठेवून महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. तो म्हणतो, मैदानावर क्षेत्ररक्षणावेळी संघांकडून सातत्याने फलंदाज बदलण्यात येतात. काहींना विश्रांतीसाठी पाठवले जाते आणि त्यांच्या जागी इतरांना आणले जाते. पंचांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याने या संदर्भात एक उदाहरणही दिले आहे. तो म्हणतो, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यावेळी सुरुवातीला ऍंण्ड्र्यू रसेल मैदानातून बाहेर गेला. मग त्याच्या जागी रिंकू सिंगला मैदानात आणण्यात आले. त्यानंतर पियूष चावलाने त्याची चार षटके टाकल्यावर तो मैदानातून निघून गेला. त्याच्या जागी रिंकू सिंगला परत मैदानात आणण्यात आले. पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यावेळीही मी हे बघितले होते. ग्लोव्हजवर बॉल लागल्यावर सरफराज खान परत मैदानात आलाच नाही. तो जखमी झाला होता की नाही, हे सुद्धा आम्हाला कळले नाही. त्याच्या जागी करुण नायर खेळायला आला आणि त्याने एक चांगला झेल टिपला.

आयपीएलच्या या १२ सिझनमध्ये षटके टाकण्याची गती अत्यंत कमी असल्यामुळे आयपीएलच्या नियामक मंडळाने दोन संघांच्या गोलंदाजांना दंड ठोठावला आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य राहणे आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यांना दंड ठोठावण्यात आला आहे. 

धावांचा पाठलाग करणारे संघ मैदानावर रणनिती आखण्यासाठी खूप वेळ घेत आहेत. एवढा वेळ नियोजन करण्याची काय गरज आहे, हे मला समजत नाही, असेही मोहंमद कैफने म्हटले आहे.