IPL 2019 MI vs SRH: सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध सुपर विजय मिळवत मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या बाराव्या हंगामातील प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत रोहित शर्माला प्रथम फलंदाजी करण्याच्या निर्णयाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर रोहितने एका वाक्यात विषय संपवला. सामन्यानंतर एका पत्रकाराने रोहितला विचारले होते की, नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला? यावर आम्ही जिंकणार हे माहित होते, असे उत्तर रोहित शर्माने दिले. त्यानं दिलेले उत्तर प्रश्न उपस्थित करणाऱ्या पत्रकारासह त्याच्या निर्णयावर टीका करणाऱ्यांची तोंड बंद करुन टाकणारे होते.
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध घरच्या मैदानावर खेळताना नाणेफेक जिंकून रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या या निर्णयावर टीका करण्यात आली होती. धुक्यामुळे मैदानावर होणारा ओलसरपणा हा गोलंदाजांसाठी मोठे आव्हान ठरतो. त्यामुळे अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकून कोणताही संघ प्रथम गोलंदाजीला प्राधान्य देतो. पण रोहितने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईने हा सामना गमावला असता तर पुढील सामन्यात त्यांना जिंका किंवा मरा अशा परिस्थितीत खेळावे लागले असते. मात्र, हा सामना जिंकून मुंबई इंडियन्सने दिमाखात प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.