India vs West Indies, 3 Day Practice Test Match: भारतीय संघाचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने कसोटी मालिकेसाठी फॉर्ममध्ये असल्याचे संकेत दिले आहेत. त्याने वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षीय एकादशसंघाविरोधातील तीन दिवसीय सराव सामन्याच्या पहिल्याच दिवशी शानदार शतक ठोकले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने ८८.५ षटकांचा सामना केला. १८७ चेंडूवर ८ चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने शतक केलेल्या पुजारासह रोहित शर्माने ६८ धावांची खेळी केली. त्याचबरोबर लोकेश राहुलने ३६, ऋषभ पंतने ३३ धावा केल्या. हनुमा विहारी ३७ आणि रवींद्र जडेजा एक धावांवर नाबाद आहे.
या सामन्यात अजिंक्य रहाणे संघाची धुरा वाहत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला, त्यावेळी भारताने ५ गड्यांच्या बदल्यात २९७ धावा केल्या. विंडीजकडून जोनाथन कार्टरने तीन विकेट घेतल्या. केयोंग हार्डिंग आणि अकीम फ्रेजरला एक-एक विकेट घेता आली.
हार्दिक आणि क्रुणालने खरेदी केली महागडी 'लॅम्बॉर्गिनी'
भारताची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने पहिल्या सत्रात १५ षटकांत ३ विकेटच्या बदल्यात ५३ धावा केल्या होत्या. लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी पहिल्या विकेटसाठी ३६ धावांची भागीदारी केली. पहिली विकेट मयंक अग्रवालची पडली. जोनाथन कार्टरने त्याचा त्रिफळा उडवला. मयंकने २८ चेंडूत १२ धावा केल्या. दुसरी विकेट राहुलची पडली. त्याने ३६ धावा केल्या.
कर्णधार रहाणेला केवळ एकच धाव करता आली. पुजाराने रोहितच्या साथीने चौथ्या विकेटसाठी १३२ धावांची भागीदारी केली. रोहितला अकीम फ्रेजरने बाद केले. त्यानंतर पुजाराने हुनामा विहारीच्या सहाय्याने चहापानापर्यंत खेळ केला.
पाकिस्तानात 'ना स्वातंत्र्य, ना सुरक्षा': ग्रँट फ्लॉवर
चेतेश्वर पुजाराने शतक करताच रिटायर्ड हर्ट होऊन तंबूत परतला. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. कार्टरने त्याला पायचीत केले. पंतने ३३ धावांची खेळी केली.