पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात आफ्रिकेचा दुसरा डाव चौथ्या दिवशीच खल्लास करत भारताने वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत विजयी चौकार खेचला. विडींज दौऱ्यावरील दोन कसोटीनंतर आफ्रिकेविरुद्ध भारताने सलग दोन विजयाची नोंद केली. इतिहासाचा वारसा लाभलेल्या पुण्यात वसलेल्या मैदानात भारताने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. घरच्या मैदानावर भारताचा हा सलग ११ वा विजय आहे. नजर टाकूयात दुसऱ्या कसोटी सामन्यातील पाच खास गोष्टींवर ...
घरच्या मैदानावर सलग ११ वा विजय
भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत घरच्या मैदानावर सलग ११ विजय नोंदवला. २०१३ पासून सातत्यपूर्ण भारतीय संघ विजयी रथावर स्वार आहे. २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाला नमवल्यापासून भारताचा विजयाचा सपाटा सुरुच आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी सामन्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियन संघाच्या नावे होता. आता हा विश्वविक्रम भारतीय संघाच्या नावे आहे.
कर्णधार कोहलीचा फॉलोऑन देण्याचा 'विराट' निर्णय
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावे या सामन्यात एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली. दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन देणारा विराट भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे. भारतीय संघाला सर्वाधिक कसोटी सामने जिंकून देणाऱ्या कर्णधारांच्या यादीत मोहम्मद अझरुद्दिन, सौरव गांगुली आणि महेंद्रसिंह धोनी यांना देखील हा पराक्रम करणे जमलेलं नाही. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने आफ्रिकेला एक डाव आणि ५७ धावांनी पराभूत केले होते. पण फॉलोऑनची संधी मिळाली नव्हती.
WTC Point Table: 'विराट' विजयासह भारतीय संघाचे द्विशतक!
यष्टिमागे साहाची 'सुपरमॅन'ला साजेशी कामगिरी
भारतीय संघाचा यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात काही अप्रतिम झेल टिपल्याचे पाहायला मिळाले. डेन एल्गर-थ्यूनिस डी ब्रून जोडीने आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण उमेश यादवच्या गोलंदाजीवर थ्यूनिस डी ब्रूनचा अप्रतिम झेल टिपत वृद्धिमानने त्याला तंबूत धाडले. या सामन्यात त्याने फाफ ड्युप्लेसिसचाही उत्तम झेल घेतल्याचे पाहायला मिळाले.
मार्करमला भोपळाही फोडता आला नाही
दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एडीन मार्करम दोन्ही डावात खाते उघडू शकला नाही. एखाद्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात शून्यावर बाद होणारा दक्षिण आफ्रिकेचा तो तिसरा फलंदाज आहे. यापूर्वी गॅरी कस्टर्न विंडीज विरुद्धच्या सामन्यात तर हर्षल गिब्ज भारत आणि विंडीज विरुद्धच्या सामन्यात दोन्ही डावात खाते उघडण्यात अपयशी ठरले होते.
INDvsSA Day 3 Stumps: फिलँडर-महाराज जोडीनं दमवलं!
फिलँडर-महाराज यांच्यातील भागीदारी
दक्षिण आफ्रिकेच्या आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यानंतर पहिल्या डावात केशव महाराज आणि फिलँडर जोडीने १०९ धावांची भागीदारी करत संघाला २७५ धावांपर्यंत नेण्यात मदत केली. दुसऱ्या डावातही फिलँडरने आठव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी रचत भारताचा विजय लांबवला.