भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. टी-२० आणि वनडे मालिकेनंतर आता कसोटी मालिका येत्या २१ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. दोन्ही संघादरम्यान दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंड इलेव्हन आणि भारतादरम्यान तीन दिवसीय सराव सामना खेळण्यात आला. हा सामना अनिर्णीत ठरला. सराव सामन्यात न खेळलेल्या कर्णधार विराटने सामन्यांनतर टि्वटरवर एक मजेशीर छायाचित्र शेअर केले आहे. यामध्ये तो वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि पृथ्वी शॉ यांच्याबरोबर दिसतो. या तिघांनी विचित्र हावभाव केल्याचे छायाचित्रात दिसते. विराटने या छायाचित्राला, 'नवीन पोस्ट सुंदर दोस्त', अशी कॅप्शन दिली आहे.
Naya post Sundar dost 🤪 pic.twitter.com/2ZQ9R9IeSB
— Virat Kohli (@imVkohli) February 16, 2020
न्यूझीलंडविरोधातील सराव सामन्यात मोहम्मद शमी आणि पृथ्वी शॉची कामगिरी चांगली राहिली. टाम इंडियाचा पहिला डाव अवघ्या २६३ धावा संपुष्टात आला होता. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत किवी टीमचा डाव २३५ धावांवरच गुंडाळला. दुसऱ्या डावात भारताने चांगली फलंदाजी करताना ४ गडयांच्या बदल्यात २५२ धावा केल्या. शमीने पहिल्या डावात १७ धावा देत ३ विकेट घेतल्या होत्या. सलामीवीर पृथ्वी शॉ पहिल्या डावात चमक दाखवू शकला नव्हता. मात्र दुसऱ्या डावात त्याने चांगली फलंदाजी केली.
भारताची कसोटी टीमः विराट कोहली, मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी आणि ईशांत शर्मा.