भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीकडे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा सर्वात मोठा आणि लक्षवेधी विक्रम मागे टाकण्याची संधी आहे. भारतीय संघ शुक्रवारपासून विंडीज विरुद्ध दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना खेळण्यासाठी जमेकाच्या मैदानात उतरणार आहे. हा सामना जिंकून कोहली एक नवा किर्तीमान प्रस्थापित करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्व करताना भारताला सर्वाधिक सामने जिंकून देणाऱ्या यशस्वी कर्णधारांच्या यादीत धोनी आणि कोहली संयुक्तपणे अव्वलस्थानी आहेत. दोघांच्या नेतृत्वाखाली भारताने प्रत्येकी २७-२७ सामने जिंकून दिले आहेत. विराट कोहलीच्या तुलनेत महेंद्रसिंह धोनीने सर्वाधिक ६० कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले असून कोहलीने आतापर्यंत ४७ सामन्यात भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले आहे. विंडीजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकत कोहलीने धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली. याशिवाय दुसऱ्या विजयासह भारतीय संघ चॅम्पियनशीप गुणतालिकेतील आपले स्थान मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असेल.
द्रविडच्या बढतीनंतर युवा संघाच्या प्रशिक्षकपदी 'या' क्रिकेटर्संची निवड
पहिल्या कसोटी सामन्यात कोहलीने भारतीय संघाची बांधणी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका असणाऱ्या माजी कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रम मागे टाकला होता. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने परदेशात सर्वाधिक सामने जिंकले आहेत. यापूर्वी हा विक्रम गांगुलीच्या नावे होता. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने परदेशात २६ कसोटी सामने खेळले असून यातील १२ सामन्यात विजय तर ९ सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ५ सामने अनिर्णित राहिले होते. गांगुलीच्या नेतृत्वाखाली २८ कसोटी सामन्यात भारतीय संघाने ११ विजय, १० पराभव आणि ७ सामने अनिर्णित असे रेकॉर्ड होते.